मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेले हे काम आणखी दोन वर्षे तरी चालेल. काम अत्यंत संथ गतीने सुरू आहेच, पण त्यात होणारे छोटे-मोठे अपघात ही मोठीच समस्या आहे. चिपळूणमध्ये बहादूर शेख नाक्यावर उड्डाणपूल कोसळून झालेला अपघात सर्वांत मोठा म्हणावा लागेल. पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच तो कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण चिपळूणचे आमदार शेखर निकम त्यात किरकोळ जखमी झाले. दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दुसऱ्या दिवशी पहाटे दुर्घटनास्थळाला भेट दिली. तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही पाहणी केली. चौकशी समिती नेमली जाणे आणि या समितीच्या निष्कर्षावर आधारित दोषींवर कारवाई करणे हे दोन्ही मंत्र्यांच्या आश्वासनाचे समान सूत्र होते. आता केंद्रीय समितीही दुर्घटनेच्या स्थळाची पाहणी करणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण विविध कारणांनी रखडले आहे. कोकणाची दुर्गमता हे सुरुवातीच्या काळात सांगितले जाणारे कारण अत्यंत अयोग्य होते. कारण कोकण रेल्वेमार्गही याच दुर्गम कोकणातून काढण्यात आला. उद्दिष्टापेक्षा केवळ तीन वर्षे उशिरा संपूर्ण रेल्वेमार्ग सुरू झाला. वाटेत असंख्य बोगदे आणि अनेक पूल उभारावे लागले. पण स्वप्नवत वाटणारे हे काम कोकण रेल्वे महामंडळाने तुलनेने अत्यंत वेळेत पूर्ण केले. सुरुवातीची काही वर्षे झालेले अपघात वगळता आता कोकण रेल्वे अत्यंत सुरळित सुरू आहे. रेल्वेमार्ग तयार करण्यापेक्षा महामार्ग तयार करणे तुलनेने नक्कीच कमी त्रासदायक आहे, पण ठेकेदारांची कमतरता, ठेकेदारांकडे असलेल्या साधनसामग्रीची कमतरता, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता, तर ठिकठिकाणी विविध कारणांनी अडथळे आणणाऱ्यांचा सुकाळ अशा अनेक कारणांमुळे महामार्गाचे काम रखडले. मध्यंतरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही भागात प्रत्यक्ष तर काही भागात महामार्गाची हवाई पाहणी केली. त्यांनीही ठेकेदारांच्या बाबतीत हतबलता व्यक्त केली, मात्र महामार्ग लवकरच पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सर्व प्रक्रिया घडत असतानाच चिपळूणमध्ये उड्डाणपूल कोसळला. आता त्याबाबत चौकशी होणार आहे. काम निकृष्ट होते का, वापरलेले साहित्य योग्य दर्जाचे नव्हते का, वगैरे चौकशी त्यात होईलच. पण अशी दुर्घटना होण्याचे मुख्य कारण म्हणजे या महामार्गाच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष हेच आहे. ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटना महामार्गाच्या निकृष्टतेबाबत आंदोलने करीत आहेत. पत्रकारांच्या संघटनांनीही यापूर्वी आंदोलने केली. मात्र त्याकडे विरोधकांनी केलेली आंदोलने या दृष्टीनेच पाहिले गेले. आंदोलकांनी मांडलेल्या समस्या प्रशासनाने दुर्लक्षित केल्या. त्या वेळीच लक्षात घेतल्या गेल्या असत्या, तर समस्यांचे मूळ कारण अवगत झाले असते. कामावर पुरेसे लक्ष राहिले असते, तर ही दुर्घटना घडलीच नसती. चौकशी होणे आणि कारवाईची आश्वासने देणे ही औपचारिकता झाली. त्यापलीकडे जाऊन महामार्ग सुरू कसा होईल, तो सुरक्षित कसा होईल, याकडे लक्ष द्यायला हवे होते. सर्वांत लांबीचा पूल उभारतानाच कोसळल्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औपचारिकतेपलीकडे जाऊन त्याचा विचार करायला हवा. रस्त्यामधल्या खड्ड्यांपेक्षा विकासकामे किती उभी केली आहेत, त्याकडे लक्ष द्यावे, असे पालकमंत्र्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. त्याची आठवण यानिमित्ताने झाली. पण रस्त्यांमधील खड्डे आणि कोसळणारे पूल यातून जीव वाचला, तरच त्या विकासाची फळे चाखता येणार आहेत, हेही लक्षात ठेवायला हवे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २० ऑक्टोबर २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

