महाराष्ट्र राज्य माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे रत्नागिरीत दोन दिवसांची पत्रकार कार्यशाळा महासंचालक, संचालक या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. दीर्घ कालावधीनंतर पत्रकारांसाठी महासंचालनालयाने आयोजित केलेली कार्यशाळा उत्तमरीत्या पार पडली. दोन दिवसांच्या कार्यशाळेत मांडता येण्यासारखे विषय मांडले गेले. पत्रकारांचे प्रबोधन झाले. नवी माहिती मिळाली. मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना रत्नागिरी जिल्ह्याची सैर त्या निमित्ताने झाली. रत्नागिरीतील अलीकडच्या काळातील विकासकामे त्यांना आवर्जून दाखविली गेली. उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेल्या या कार्यशाळेने पत्रकारांच्या बाबतीत मात्र अनेक प्रश्न अनुत्तरितच ठेवले. किंबहुना पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देण्याकरिता कार्यशाळेचा उतारा देण्यात आला.