उशिरा सुचलेले शहाणपण

मोठे आंदोलन उभे राहिल्यानंतर प्रशासनाला आता स्थानिक ग्रामस्थांशी समन्वय साधण्याचा उपाय सुचला आहे. पण ही पश्‍चात बुद्धी म्हणता येईल. स्थानिक ग्रामस्थांना केवळ गृहीत धरले जाते. त्यांना समजून सांगण्याची आणि त्यांना समजावून घेण्याची भूमिका प्रशासन कधीच घेत नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासन धडपडत आहे, पण एकदा प्रशासनाच्या विरोधात मत झाले की ते पुन्हा प्रशासनाच्या बाजूने व्हायला खूप काळ जावा लागेल. त्यात वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी आपापल्या राजकीय सोयीनुसार विविध मतमतांतरे प्रकट करत असतात.

पत्रकारांना हाकलण्याचा उद्दामपणा

आपल्यावरील अन्यायाविरुद्ध पत्रकार रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची शक्यता नाही आणि त्यांनी तसे ते केले तरी ते केवळ प्रतीकात्मक असेल. नेत्यांप्रमाणे त्यांच्या पाठीशी लोकांचा जमाव नसतो. पण तरीही लोकमत जागवण्याचे, नवी मते निर्माण करण्याचे काम माध्यमेच करू शकतात. दडपशाही करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकमत तयार करण्याचे कामही ही माध्यमे करू शकतात, याची जाणीव प्रशासनाने ठेवायला हवी. लोकप्रतिनिधी संभ्रम निर्माण करतात, माध्यमे समन्वय निर्माण करू शकतात. त्यांच्याशी प्रशासनाने समन्वयानेच वागायला हवे. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मुळावर येऊ शकतो.