वालावलची रामनवमी

आज रामनवमी म्हणजेच आमच्या गावची जत्रा. माझं गाव वालावल, हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात येतं. आमच्या गावाची ओळख आमच्या गावातील निसर्ग जसा करून देतो, तशीच ओळख आमच्या गावातील रामनवमीची आहे. निसर्गाने नटलेल्या या गावात छोटे-मोठे उत्सव नेहमी होत असतात. परंतु हिऱ्यामध्ये जसा कोहिनूर हिरा म्हटला, की त्याची ओळख वेगळी बनते तसेच काहीसे या रामनवमीचे आहे. आता तुम्ही म्हणाल रामनवमी दर वर्षी असते, मग हा आजच का त्याबद्दल लिहितो आहे? तर या वर्षी करोना विषाणूच्या प्रभावामुळे आमच्या गावातील रामनवमीचा उत्सव हा सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रद्द करण्यात आला आहे. हा उत्सव रद्द करताना मनातील ज्या भावनेवर दगड ठेवला गेला तो गावातील प्रत्येकाला स्वीकारताना जड जात आहे. या उत्सवाची मजा काही औरच असते. ती ज्याने अनुभवली तो आज नक्की चुकचुकत असणार यात तिळमात्रदेखील शंका नाही.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला श्री लक्ष्मीनारायण मंदिरात गावातील बारा पाचाचे मानकरी एकत्र येऊन नारायणा समोर नारळ ठेवून या उत्सवाला प्रारंभ करतात. मग पंचांगाचे वाचन होते आणि इथून पुढे उत्सव सुरू होतो. रोज वेगवेगळ्या मंडळाची दशावतार नाटके रंगतात. कीर्तन, पालखी सोहळा सुरू होतो. रोज नारायणाची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. हे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक या उत्सवासाठी लांब लांब वरून खास येतात. रामजन्म व चैत्र शुद्ध एकादशी हे या उत्सवातील मुख्य आकर्षण. असे काहीसे या रामनवमी उत्सवाचे स्वरूप असते.

या उत्सवात खरी मजा तर रावनवमीच्या आधी दोन दिवसांपासून सुरू होते. पंचक्रोशीतील भक्तांची तर रोजच वर्दळ सुरू असते. परंतु या उत्सवासाठी खास करून चाकरमानी गावात येतात. आमच्या गावातील चाकरमानी एक वेळ मे महिन्याच्या सुट्टीत गावी येणार नाहीत; परंतु हा उत्सव सहसा कोणी चुकवत नाही. या काळात गावातील प्रत्येक घर हे चाकरमान्यांनी गजबजलेले असते. एखादा चाकरमानी जर या उत्सव काळात दिसला नाही, तर त्याची प्रत्येक जण आपुलकीने चौकशी करतो. हे प्रेम मी लहानपणापासून बघत आलो आहे.

रामनवमीच्या आदल्या दिवसापासून मंदिर भक्तांच्या गर्दीने ओसंडून वाहत असते. मंदिराभोवती वेगवेगळी दुकाने सजू लागतात. मालवणी खाजे, लिंबू सरबत, खेळणी, घरगुती वापरातील वस्तू यांचा तर पूरच आलेला असतो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कलिंगडाचे ढिीगच्या ढीग येथे पहायला मिळतात. लहान मुले आणि काही हौशी कलाकार तोंडात पेपटणे घेऊन आपले वेगळे सूर या गर्दीच्या आवाजात भरत असतात. एक वेगळाच गोंधळ या दिवसांत पाहायला मिळतो.

गावातील प्रत्येक घरात गृहिणीची अगदी गडबड चाललेली असते. पाहुणे एवढे असतात, की प्रत्येकाचा पाहुणचार करताना गृहिणींना अगदी पुरे होते. रामनवमीच्या दिवशी गावातील बहुतांशी घरात एक ठरलेला जेवणाचा मेन्यू असतो, तो म्हणजे वालीची भाजी, डाळीची हिरव्या मिरच्या घालून केलेली आमटी आणि भात. हा मेन्यू करण्यामागचे कारणदेखील तसेच असते. कारण जेवणाच्या पंगती ह्या बाराच्या आत उठवायच्या असतात. बारा वाजता देवळात पोहोचणे प्रत्येकासाठी बंधनकारकच असते. कारण याच सुमारास श्री रामप्रभूंचा जन्म जन्म होतो व हा सोहळा प्रत्येकाला पाहायचा असतो. जेवणाला उशीर होत आहे असे वाटले, की घरातील जाणकार व्यक्ती गमतीने म्हणते, ‘चला चला आटपा लवकर कौसल्येच्या पोटात दुखू लागले आहे.’

जेवण झाल्यावर प्रत्येक जण मंदिराची वाट धरतो. या काळात गावातील घर कधी बंद ठेवले जात नाही. कोणी ना कोणी घरात थांबून अचानक येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतच असतो. गावात येणारा पाहुणा उपाशीपोटी परतून जाऊ नये म्हणून सर्व जण काळजी घेतात. मंदिरात गेल्यावर परगावावरून आलेल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची प्रत्येक जण आपुलकीने चौकशी करतो, एकमेकांवर विनोदाच्या अत्तरदाणीने अमृताचा वर्षाव केला जातो आणि मग गप्पांचे फड रंगतात. उन्हाचा त्रास होत आहे असे वाटले, की समूहाच्या समूह लिंबू सरबत किंवा कलिंगडाच्या दुकानाभोवती जमतो. या सगळ्या माहौलात फक्त आणि फक्त प्रेमाची लाट पहायला मिळते. रामजन्माच्या गुलालात रंगलेला प्रत्येक जण या प्रेमाच्या रंगात अक्षरशः भिजून जातो.

हा असा प्रेमाच्या लहरीने सजलेला उत्सव या वर्षी गावातील प्रत्येक जण काळजावर दगड ठेवून आठवतो आहे. गावातील प्रत्येकाच्या मनात एकच चालले आहे, श्री लक्ष्मी नारायणाने काहीत री चमत्कार करावा व हा सोहळा अनुभवता यावा. परंतु सरकारी नियम व कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणीही काही करू शकत नाही ही एकच खंत प्रत्येकाला खात आहे. ज्याने हा उत्सव अनुभवला आहे तो देवासमोर एकच गाऱ्हाणे घालतो आहे, या जगाला करोनापासून वाचाव व परत सगळे जनजीवन सुरळीत कर. ही एकच भाबडी आशा प्रत्येकाच्या मनात आहे. या वर्षी स्वतःच्या उत्साहाला थोडी मुरड घातली. पुढील वर्षाची वाट प्रत्येक जण बघत असणार यात शंका नाही.

ओम नमो नारायणाय

  • डॉ. प्रणव अशोक प्रभू
    संपर्क :
    ९४२१० ७३९०७
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply