रत्नागिरी : ‘गेल्या काही दिवसांपासून होणारी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ अनाकलनीय आहे. ग्राहकांनीच त्याची दखल घेतली पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया फामपेडा म्हणजेच फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केली.
गेल्या एक जून रोजी राज्य सरकारने सुमारे दोन रुपयांचे एक्साइज शुल्क वाढवले. त्यानंतर सात जूनपासून दरवाढ होत आहे. गेल्या दहा-बारा दिवसांत पेट्रोलमध्ये सुमारे सव्वासात रुपयांची वाढ झाली आहे. याबाबत श्री. लोध यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘करोनाप्रतिबंधक लॉकडाउनच्या काळात ग्राहकांसाठी इंधनाचे वितरण थांबले होते. त्या काळात इंधनाची विक्री केवळ दहा टक्के झाली. इंधनाच्या किमतीही त्या काळात कमी होत्या; पण लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या पिंपाचा दर ३५ ते ३७ डॉलर एवढाच असूनही, गेल्या सात जूनपासून इंधनाच्या दरात लिटरमागे सुमारे सव्वासात रुपयांची वाढ झाली आहे.’
‘लॉकडाउनच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर खूपच कमी झाले होते. त्या काळात सरकारने मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजारातून खरेदी करून ठेवली असण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होणाऱ्या होणाऱ्या दरांचा ग्राहकांना फायदा झाला पाहिजे, यासाठी २०१७ सालापासून पंधरा दिवसांऐवजी दररोज इंधनाचे दर निश्चित करण्याचे धोरण केंद्र शासनाने राबवले आहे. त्यामुळे आत्ताही आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती कमी असताना त्याचा फायदा ग्राहकाला मिळाला पाहिजे. प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती स्थिर असूनही त्यांचा फायदा ग्राहकांना देण्याऐवजी दररोज दर वाढत आहेत. करोनाच्या काळात सरकारचे मोठे नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी दरवाढ केली गेली असू शकते. दरवाढीला अन्य कोणताही आधार नाही,’ असे श्री. लोध यांनी स्पष्ट केले.
‘इंधनाच्या किमती दररोज बदलण्याच्या धोरणामुळे रोज वाढणारी किंमत ग्राहकांच्या लक्षात येत नाही; मात्र कोणत्या आधारावर दरवाढ केली जात आहे, हे समजून घेण्याचा ग्राहकाचा हक्क आहे. ग्राहकांनीच आता पुढाकार घेतला पाहिजे,’ असे मत श्री. लोध यांनी व्यक्त केले.
…………………………….