मुंबई : लॉकडाऊन काळात बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरू करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. वीजबिलाचे प्रतिमाह विभाजन करून वीज वापराप्रमाणे मिळणारी सवलतही (स्लॅब बेनिफिट) देण्यात आली असून, ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. परिणामी एप्रिल व मे महिन्यात मीटर रीडिंग घेणे शक्य झाले नसल्याने जानेवारी ते मार्च-२०२० या तीन महिन्यातील वीज वापराच्या सरासरी युनिटप्रमाणे या दोन्ही महिन्यांचे वीजबिल आकारण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन व वाढत्या तापमानामुळे प्रत्यक्षात विजेचा वापर अधिक होता. मात्र कमी वीज वापर असणाऱ्या महिन्यातील सरासरीप्रमाणे वीजबिल आकारण्यात आले. आता प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे मागील दोन-अडीच महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत असताना हे वीजबिल अधिक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकत्रित दिलेल्या बिलाचे विभाजन करून ग्राहकांना स्लॅब बेनिफिटही देण्यात आले आहे. मीटर रीडिंग व वीजबिल यात तफावत असणारी बिले दुरुस्त करून देण्यात येतील. तसेच लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांनी भरणा केलेल्या रकमेची वीजबिलातून कपात करण्यात आली आहे.
‘एकत्रित बिल आल्यास घाबरू नका’
लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रीडिंग तात्पुरते बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले होते. तसेच वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. मात्र एप्रिल, मे, जून महिन्यांत स्वतःहून रिडींग न पाठविणाऱ्या वीजग्राहकांना आता मीटर रीडिंग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे. हे वीजबिल लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे असले तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक वापरानुसार विभागणी करून युनिट व वापराप्रमाणे वीजदर लावून (स्लॅब बेनिफिट) देण्यात येत आहे.
उदा. दोन महिन्यांचे वीजबिल ३३० युनिट असल्यास ३३० युनिटचा स्लॅब दर न लावता मासिक प्रत्येकी १६५ युनिटप्रमाणे स्लॅब दर लावण्यात येत आहे. तसेच एप्रिल व मे महिन्यांतील सरासरी युनिटचे व बिलाची रक्कम भरली असल्यास स्थिर आकार, विद्युत शुल्क वगळून उर्वरित रकमेचे समायोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी संबंधित वीजबिलामध्ये ठळकपणे नमूद करण्यात येत आहे.
………………….
