रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० जून) सायंकाळपर्यंत करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४७६ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दोन नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथील रुग्णांची एकूण संख्या १६० झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज रत्नागिरीतील समाजकल्याण येथील कोव्हिड केअर सेंटरमधून दोघांना, तर लांज्यातील देवधे येथील कोव्हिड केअर सेंटरमधून एकाला अशा तिघांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३४९ झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कालच्यापेक्षा आज किंचित घटले असून, ते ७३ टक्के झाले आहे.
सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १११ आहे. त्यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी चार साडिवली, तसेच उत्तर प्रदेशातून आलेले तीन, विधानगर (कराड) येथील एक, तर कर्टेल (ता. खेड) येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. ही माहिती रुग्णांनी दाखल होताना नोंदविलेल्या पत्त्यानुसार आहे, असे जिल्हा रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी तीन रुग्णांना आज (२० जून) डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११७ झाली आहे. काल (१९ जून) जिल्ह्यात आणखी दोन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील एक आणि कुडाळ तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६० झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे.
सिंधुदुर्गात आज (१६ जून) चार रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या १५४ असून, त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
……….

…………………………

