खावर स्मृती राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

दापोली : येथील युवा फाउंडेशन संचालित दापोली साहित्य कट्टा आणि मित्रांच्या कविता यांच्या संयुक्त पुढाकाराने पं. बद्दिउज्जमा खावर साहेबांच्या तिसाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

दापोली तालुक्याचे शिवसेनेचे सचिव आणि साहित्यप्रेमी सुधीरभाऊ कदम या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. मित्रांच्या कविता फेसबुक पेजवरून पांडुरंग जाधव यांनी सुधीरभाऊना ऑनलाइन आमंत्रित केले. त्यानंतर राज्यभरातून प्राप्त झालेल्या एकूण १६० कवितांमधून सर्वोत्कृष्ट म्हणून निवड झालेल्या तीन कवींच्या, तसेच उत्तेजनार्थ पाच विजेत्यांची घोषणा सुधीरभाऊंनी केली. पहिले तीन विजेते असे – जालन्याचे प्रभाकर शेळके (बाप कृपावंत), सौ. रंजना केणी, पनवेल, रायगड (मेघदूत), सिद्धेश लखमदे, मुरूड-जंजिरा, रायगड गझल). या तीन क्रमांकाना अनुक्रमे रोख १०००, ७५० आणि ५०० रुपये आणि डिजिटल सन्मानपत्र दिले जाणार आहे. रोख रक्कम थेट विजेत्यांच्या बँक खात्यात जमा होईल. याशिवाय समिधा गांधी (सखी), पनवेल, मधुरा गावकर (रेघोट्या), मालवण, सचिन राऊत (शुभेच्छा) माढा, सोलापूर, बाबू घाडीगावकर (तारांगण), दापोली, सीमा गांधी (मातीचे कारुण्य), पुणे यांच्या कविता उत्तेजनार्थ ठरल्या.

स्पर्धेचे परीक्षण दापोलीतील ख्यातनाम साहित्यिक इक्बाल शर्फ मुकादम आणि सुप्रसिद्ध गीतकार, कवी नीलेश उजाळ यांनी केले. स्पर्धेत कवी/कवयित्रींना आधी संकेत क्रमांक दिले गेले होते. या संकेत क्रमांकासह आणि कवी, कवयित्रींच्या नावाशिवाय कविता परीक्षकांकडे परीक्षणासाठी दिल्या होत्या. स्पर्धा अधिक पारदर्शक करण्यासाठी हा अभिनव प्रयोग करण्यात आला होता. तो यशस्वी झाला.

स्पर्धेच्या निकालाबरोबरच मित्रांच्या कविता आणि कोकणदीप प्रकाशनाच्या पाऊस या विषयावरच्या “ऋतू कवितांचा” ई काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. कोकणदीपचे संस्थापक दिलीप शेडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे प्रकाशन करण्यात आले. कलाकारी क्रिएशनच्या कलाकारी – हिरकणी या कविता व्हिडीओ सादरीकरण स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचाही निकाल कवयित्री जागृती सारंग आणि विनया कविटकर यांनी जाहीर केला. आरुषी दाते, प्राप्ती गोताड, मीनाक्षी पाटोळे, अस्मिता युवराज, रंजना केणी, मोहना टिपणीस, रूपाली कुलकर्णी, रूपश्री वनारसे, श्रद्धा वझे यांची सर्वोत्तम नऊमध्ये निवड झाली आहे. नेहल जोशी ही शाळकरी विद्यार्थिनी लक्षवेधी म्हणून निवडली गेली आहे. पूर्ण लाइव्ह सेशनमध्ये पांडुरंग जाधव यांनी नेटके सूत्रसंचालन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply