विद्या अधरी असलेले साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर (सिंधुसाहित्यसरिता – ६)

डॉ. विद्याधर करंदीकर (२ नोव्हेंबर १९५८ – १ ऑक्टोबर २०१६)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा सहावा लेख… साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे माधव गावकर यांनी…
………
कणकवली बाजारपेठेत एका जुन्या चाळीत, एका दरवाजावर पाटी दिसते, ‘डॉ. विद्याधर करंदीकर (दंतवैद्य).’ या सामान्य दृश्यावर जाऊन आपण साशंक होतो. अशा जुन्या जागेत दवाखाना? पण दिसतं तसं असतंच असं नाही. नव्हे, इथे वेगळंच दिसेल तुम्हाला! गरम जाहिरात, प्रसिद्धी, भव्य देखावा वगैरे काहीही नसलेल्या जागेत एक अत्यंत कुशल दंतवैद्य होते डॉ. विद्याधर करंदीकर! रुग्णांना गुण दवाखान्याच्या भव्यतेने येत नाही, तर डॉक्टरांच्या कुशल उपचारक्रियेने येतो, हे सिद्ध करणारा हा दवाखाना! हे करंदीकर डॉक्टरांचं व्यवसाय साधन; पण जगण्याचं टॉनिक होतं ते ‘लेखन, वाचन, अध्ययन आणि अध्यापन!’ ही दोन्ही क्षेत्रं सारखीच प्रभावी! पण हेतू मात्र पूर्णपणे वेगवेगळे!

गेली पंचवीस वर्षं मी त्यांच्या या दोन्ही विश्वांत अगदी मनसोक्त संचार केला. एक मित्रस्थान मिळवलं ते डॉक्टरांच्या माझ्यावरील निरतिशय मित्रप्रेमामुळे! डॉ. विद्याधर कुशल दंतशल्यविशारद होतेच; पण दातांचे उपचार करीत असताना जिव्हाग्रावर साक्षात सरस्वतीचा वास असणारे. अधरावर विद्या धारण केलेले असे विद्याधर होते. त्यांचा गद्य-पद्य साहित्य परिचय करून घेणे हा या लेखनाचा हेतू असल्यामुळे त्याविषयीच्या निस्सीम सीमारेषा आपण यथामति, यथाज्ञानेन पाहणार आहोत.

साहित्याचा आढावा
१९९५ साली कणकवलीत ‘चंदनी धुक्यामध्ये’ या डॉक्टरांच्या काव्यसंग्रहाचे ‘बालभारती’चे दया पवार यांच्या हस्ते प्रकाशन होते. त्यांनी त्या वेळी काढलेले उद्गार ही डॉक्टरांची खरी साहित्यिक ओळख होती.

ते म्हणाले होते, ‘निसर्गातून माणूस तयार झाला; पण यांत्रिक प्रगतीमुळे ही नाळ तुटत चालली. ती पुन्हा जोडण्याची मानसिकता आणि वास्तव यामधील द्वंद्वाच्या कल्लोळातून विद्याधरांची कविता जन्मली असावी. चंदनी धुक्यापलीकडील तेजाची या कवीला ओढ आहे. अनेकदा त्यांची कविता तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जाते. उदा. मी पाठ्यपुस्तकासाठी त्यांची ‘किनारा’ ही कविता निवडली. त्यातील वाच्यार्थ आणि गर्भितार्थ वेगळेही असू शकतात. त्यांच्या काव्याचे अनेक अर्थ संभवतात. माझी डॉ. करंदीकरांशी दुरान्वयानेही ओळख नसताना मी या कवितेसाठी शिफारस केली, यावरून त्यांच्या अत्त्युच्च साहित्यिक गुणवत्तेची खात्री पटेल.’

दया पवारांच्या या भाषणानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या शेकडो विचारवंत, गुणवंतांनी सन्मानपूर्वक टाळ्या वाजविल्या हे मी स्वत: पाहिले आहे! कारण, मी त्या वेळी ‘चंदनी धुक्यामधील’ काही कविता गाणार होतो… या आठवणीऐवजी डॉक्टरांच्या साहित्यसंपदेची सर्वज्ञात यादीच लिहिली असती तर ‘साहित्यसरिता’ या सदराला काय महत्त्व होतं? साहित्यनिर्मितीत त्या त्या वेळी साहित्यिकाची मानसिकताच शब्दरूप घेते, नाही का?

डॉ. विद्याधर यांचे शालेय शिक्षण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये झाल्यानंतर पदवीसाठी मुंबईचा संबंध आला. बीडीएस (मुंबई) आणि एमए, पीएचडी (मुंबई विद्यापीठ), तसेच ‘संस्कृतकोविद’ या पदव्या त्यांनी प्राप्त केल्यामुळे त्या पदव्याच सन्मानित झाल्या असंच मी म्हणेन! पदव्या कागदावर असतात; पण विद्याधरांसारखे चालतेबोलते ग्रंथ, संदर्भ आपल्या जिव्हाग्रावर ठेवून चालतात. त्या वेळी पदव्याच सन्मान्य ठरतात.

कोणताही मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी संदर्भ विचारा, दोन मिनिटांत तुम्हाला त्याचा तोंडी खुलासा मिळेल! याचं एक उदाहरण सांगतो. डॉक्टरांना मी एकदा विचारलं, ‘ही गावांची नावं असतात ती कशी निर्माण झाली? उदा. माझ्या गावाचं नाव ‘असगणी’ आहे! या शब्दाचा अर्थ काय होतो?’ डॉक्टर लगेच म्हणाले, “हा संस्कृतचा अपभ्रंश आहे. ‘अस्यगणनीय्ं!’ असा मूळ शब्द आहे! म्हणजे हासुद्धा गाव म्हणून गणना करता येईल. हा ‘असगणी’चा अर्थ.’ म्हणूनच मी त्यांना ‘विद्या अधरी विद्याधर’ म्हणतो.

त्यांचं कॉलेज शिक्षण चालू असतानाच, गद्य-पद्य लेखनाला सुरुवात झालेली होती. मध्यंतरी व्यावसायिक सुस्थिरता येईपर्यंत थोडा खंड पडलाही असेल; पण आपण सकस लेखन करू शकतो याची त्यांना तेव्हाच जाणीव झाली होती. पुढे अनुकूलता निर्माण झाल्यानंतर याच बीजांना समृद्ध, सशक्त अंकुर फुटले! अंतर्मनात असणारे अंकुर गद्य, पद्य स्वरूपात प्रकटले. डॉक्टरांचे आराध्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एके ठिकाणी लिहिलंय…

ना कविता निजभक्ता त्यागिना कधी ।
भक्त तिला त्यागो, ती त्यागिना तया ।।

जणू विद्याधरांचंच हे गुणवर्णन! एकीकडे दवाखाना, एकीकडे साहित्यनिर्मिती हे चालू असताना डॉक्टरांनी संशोधनपर प्रबंध लेखनाला सुरुवात केली होती. या पीएचडीच्या प्रबंधाचा विषय होता ‘मराठी कवींची नाट्यसृष्टी – स्वरूपविशेष. विशेष संदर्भ – कवी वि. दा. सावरकर यांची नाटके.’ एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा उगम तपासणे हा डॉक्टरांचा स्वभावच होता. त्या पद्धतीने अध्ययन, लेखन, दवाखाना हे सगळं सांभाळणं फार कष्टाचं, किंबहुना दुरापास्त असंच होतं! परंतु हा प्रबंध त्यांनी इतक्या तयारीने मांडला, की मुंबई विद्यापीठाचं सर्वोत्तम प्रबंधाचं अ. का. प्रियोळकर पारितोषिक त्यांना प्राप्त झालं. असा अभ्यास करायचा म्हणजे अनेक संदर्भ शोधावे लागतात. अशा वेळी एकदा त्यांच्या वाचनात स्वा. सावरकरांनी लिहिलेलं ‘वैनायक’ वृत्त आलं. हे वृत्त सावरकरांनी स्वत: निर्मिलेलं होतं. हे वृत्त ‘धवलचंद्रिका’ या वृत्ताचं संस्करण आहे. मग त्यात सावरकरांनी कोणते बदल केले? हे जाणून घेण्यासाठी या वृत्ताची तालानुसार मांडणी, जी संगीत शास्त्रावर आधारित आहे, ती मी मांडावी, त्यासाठी आवश्यक तो अभ्यास करावा, असं सांगून ते वृत्त तालानुसार मांडून घेतलं! एवढ्या सखोलपणे घेतलेला वेध त्यांना पुरस्कार देणारा ठरला! अध्ययनाची ही एक वेगळीच परिसीमा!

डॉक्टर संगीताचे चाहते होते. संस्कृतचेही अभ्यासक होते. त्यांची काव्यप्रतिभा ऐकून गोव्यातील मंगेशी देवस्थानचे विश्वस्त श्री. धुमे यांनी त्यांना श्री मंगेश स्तोत्र लिहायला सांगितलं. ते डॉक्टरांनी ‘श्री मांगिरीश सुप्रभातम्’ या नावाने लिहिलं. सुप्रभातम्, स्तुती, स्थलवर्णन, कथा, प्रार्थना या धर्मसंमत पद्धतीनुसार त्यांनी स्तोत्राची रचना केली. तसंच कणकवली नगरीचं वर्णन करणारं ‘कनकवल्ली स्तोत्र’ही त्यांनी लिहिलं आहे. त्यांच्या छापील साहित्याव्यतिरिक्त, मांगिरीश सुप्रभातम् स्तोत्र, कवी विंदा करंदीकरांच्या साहित्यावर आधारित ‘स्वच्छंद’ कार्यक्रम, डॉक्टरांच्या कवितांवरील बिल्वदल कार्यक्रम यांचं संगीत बसवून मी कार्यक्रम केलेले आहेत. ‘स्वच्छंद’चे पन्नासच्या वर कार्यक्रम झाले, चालू आहेत. याचबरोबर कवितांना स्वतंत्रपणे पुरस्कारही मिळाले आहेत.

डॉक्टरांच्या काही कविता
किनारा :
ही कविता सहावीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात समाविष्ट होती
पहाट : या कवितेला पुणे कला संस्कृती मंडळाचा बालकवी ठोमरे पुरस्कार.
अंगार मस्तकीचे, कुठे हरवले इंद्रधनू, किनारा, हिरवे खेडे, ते हळवे गाणे : साप्ताहिक सकाळ
केवडा : राज्यस्तरीय प्रेमकविता स्पर्धा पारितोषिक.

डॉ. विद्याधर करंदीकरांची प्रकाशित ग्रंथसंपदा
चंदनी धुक्यामध्ये (कवितासंग्रह), महोत्सव आणि तीन एकांकिका (मालवणी), कवी केशवसुत यांचे चरित्र, पहिला माझा नंबर (नाटक), चैतन्यमय निबंध, ५१ निबंध, शालेय संस्कृत निबंध, तुम्ही हे वाचलेच पाहिजे…, शब्द जुळले – सूरही जुळले…, बॅ. नाथ पै यांचे चरित्र – असाही एक लोकनेता, कवी नाटककार सावरकर (प्रबंध, पुस्तकरूप)
रंगमंचीय कार्यक्रम : स्वच्छंद, अमृतधारा, मेघदूत, शीलं परं भूषणम्, निबंध, वक्तृत्व कार्यशाळा

डॉक्टरांची ही साहित्यसंपदा पाहिली, की खूप आयुष्य लाभलेल्या माणसाचं हे कर्तृत्व आहे असंच वाटतं! पण दोन नोव्हेंबर १९५८ रोजी या जगात प्रवेश केलेले विद्याधर वयाच्या ५८व्या वर्षापर्यंतच इथे थांबले! त्यांची लेखनसाधना ऐन बहरात येऊन फुलत असतानाच एक ऑक्टोबर २०१६ या घटस्थापनेच्या दिवशीच डॉक्टर कुणालाही पूर्वसूचना न देता निघून गेले. डॉक्टरांच्या दृष्टीला कुठे तरी अनंताच्या प्रवासाची चाहूल तर लागली नव्हती ना, असं सतत मला वाटतं. शेवटी लिहिलेल्या ‘मांगीरिश सुप्रभातम्’मधल्या या पंक्ती पाहा!

द्यावे मला शिवप्रभू इतुकेचि द्यावे ।
मंगेश नाम स्मरता शिवरूप व्हावे ।
ध्यानी निमग्न व्हावे तव गीत गात ।
श्री मांगिरीश सुभगा तव सुप्रभात ।।

एक ऑक्टोबर २०१६च्या सुप्रभाती हे मांगिरीश सुप्रभातम् स्तोत्र मंगेशीच्या मंदिरात गायिलं जात होतं, त्याच दिवशी इकडे घरी डॉ. विद्याधरांनी देह ठेवला! यानंतर ते आपल्याला कधीही दिसणार नाहीत, या वेदना असह्य झाल्या होत्या. त्यांच्या साहित्याचे नवनवे कंगोरे मी उलगडून पाहतो आहे. या विधानाचा क्षणार्धात भूतकाळ झाला. या विचित्र योगायोगाने मी अस्वस्थ झालो. डॉक्टरांच्या प्रयाणाचा त्यांनी एका कवितेत खूप पूर्वी विचार मांडला होता.

स्पष्ट दिसे नयनांना मार्ग महायात्रेचा
दिवसाचा मोह नसे, आज ध्यास तमिस्रेचा
पुण्यक्षेत्रीचा सूर्य पश्चिमेस बुडताना
शब्द विरे अवकाशी एक दीप विझताना

अनंत यातना देणाऱ्या पंक्ती आजच आठवल्या! कारण….? हाच तो दिवस! डॉक्टरांचा चौथा स्मृतिदिन! आज एक ऑक्टोबर २०२०! प्रसिद्धीपासून सतत दूर राहणारे डॉक्टर आजच्याच दिवशी आमच्यापासूनही दूर गेले! नाईलाजाने म्हणावं लागतं, ‘शुभास्ते पंथान: सन्तु!’

माधव धोंडो गावकर
(निवृत्त शिक्षक, संगीत विशारद)
पत्ता : नाडकर्णीनगर, कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०२
मोबाइल : ९४२३८७९२०७
…..
(कोमसाप-मालवण शाखेने डॉ. विद्याधर करंदीकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे ग्रंथगौरवगीत संगीतबद्ध करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माधव गावकर यांनीच त्या गीताला संगीत दिले आहे. तो व्हिडिओ सोबत दिला आहे.)


सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply