रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्सना रात्री १२ वाजेपर्यंत व्यवसाय करायला परवानगी मिळाली आहे. जिल्हा हॉटेल संघटनेने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्स आणि उपाहारगृहांना करोनाप्रतिबंधक निर्बंधांनुसार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंतच व्यवसायाला परवानगी देण्यात आली होती. या निर्बंधांमुळे हॉटेल व्यवसाय कोलमडून पडला होता. रात्री 9 नंतर हॉटेल्समध्ये ग्राहक यायला सुरुवात होते. नेमकी १० वाजताच हॉटेल्स बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याने हॉटेल्समध्ये कोणी ग्राहक येत नसत. बाहेरगावाहून आलेले तसेच काही पर्यटक ग्राहक १० वाजल्यानंतरही थांबत असल्याने त्यांना बाहेर जायला सांगण्याची वेळ आली, तर अनवस्था प्रसंग ओढवत असे. अशा स्थितीत व्यावसायिकांना नुकसान सोसावे लागत होते.
यावर दाद मागण्यासाठी रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांच्या मार्गदर्शनानुसार उपाध्यक्ष उदय लोध, सचिव सुनील देसाई, सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत, राकेश भोसले, महेश सावंत यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या. रात्री हॉटेल बंद करण्याची वेळ ११ नंतरची करावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अध्यक्ष श्री. कीर यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांनाही हॉटेल व्यावसायिकांना न्याय देण्याची विनंती केली.
या सर्व प्रयत्नांना यश आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी आज नवे आदेश जारी करून जिल्ह्यातील हॉटेल्सना रात्री १२ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व हॉटेल व्यावसायकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media