गोधडी शिवण्याची कार्यशाळा

गोधडीला
आईच्या फाटक्या लुगड्याचे
आणि
बापाच्या फाटक्या धोतराचे
अस्तर असते

(डॉ. कैलास दौंड)

चिंध्या चिंध्या जमवीत
आई आयुष्य वेचते
खरखरीत हाताने
मऊ मऊ गोधडी शिवते

(डॉ. संजय खैरे)

मराठीतील अशा अनेक कवितांमध्ये आणि अनेक कथा-कादंबऱ्या आणि ललितलेखांमध्ये गोधडीला अनन्यसाधारण स्थान आहे. कारण गोधडी म्हणजे कौटुंबिक कष्टाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असते. ती केवळ एक मामुली चादर नसते. त्यात मायाममतेला ऊब देण्याची ताकद असते. प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते. गोधडीच्या आत लपेटून शिवलेले कापड म्हणजे गोधडीवरचे अस्तर वडिलांच्या फाटलेल्या धोतराच्या किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते. त्यामुळे गोधडीवर जणू आई-बाबाची माया लपेटलेली असते. गोधडीच्या आत आईने दामटवून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात. त्या वरवर पाहता चिंध्या असतील, पण त्या मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला जुना जीर्ण झालेला सदरा असतो. आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एक तुकडा असतो आणि पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळे लावलेले तुकडे असतात.

असे भावनांचे अनेक पदर असलेली गोधडी म्हणजे आता पारंपरिक वस्त्र न राहता त्यालाही चांगले दिवस आले आहेत. गोधडीबद्दलचे कुतूहल जागृत झाले आहे. याच कुतूहलाची पूर्तता करण्यासाठी गोधडी शिवण्याचे वर्गच सुरू करण्यात आले आहेत.

उद्धर (जि. रायगड) येथील इको-आर्किटेक्ट आणि सेंद्रिय शेतकरी तुषार केळकर हे या वर्गाचे उद्गाते आहेत. नैसर्गिक साहित्याने घरे कशी बांधायची आणि सेंद्रिय शेती कशी करायची, याचे उत्तम ज्ञान केळकर यांच्याकडे आहे. त्यांच्या गावात त्यांची स्वतःची शेती आहे आणि गेल्या ७ वर्षांपासून या दोन्ही क्षेत्रांत कार्यरत आहेत.

पारंपरिक शेती आणि घरबांधणीबरोबरच इतरही काही परंपरा जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गोधडी हा आता काहीसा कालबाह्य झालेला प्रकार पुनरुज्जीवित करण्यासाठी ते आता प्रयत्नशील आहेत. जुनी कला जोपासण्याबरोबरच ती जोपासणाऱ्यांना रोजगार मिळवून देणे हाही त्यांचा हेतू आहे.

गोधडी बनवणे ही एक जुनी कला आहे. आपल्या आजी-आजोबांच्या काळात त्याला खूप महत्त्व होते. आता जसे व्हॉट्स अॅपवर ग्रुप करून व्हिडीओ कॉल करता करता कामे केली जातात, अगदी त्याच पद्धतीने पूर्वीच्या स्त्रिया दुपारी किंवा संध्याकाळी एकत्र बसून गप्पा मारत गोधड्या शिवत असत.

गोधडी शिवताना खूप जास्त संयम आणि चिकाटी लागते. तसेच एखादी साधना करता करतासुद्धा हे काम करता येते. म्हणजे मेडिटेशनही होते आणि कामही. स्वतःच्या हाताने विणलेल्या गोधडीची ऊब न्यारीच असते.

श्री. केळकर यांच्या आत्मतृप्ती फार्मवर गोधडी शिवण्याची दोन दिवसांची छोटेखानी कार्यशाळा आयोजित केली आहे. ज्यांना गोधडी शिवण्यात स्वारस्य असेल, त्यांनी त्यासाठी संपर्क साधावा. पावसाळ्यातील सुखद वातावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यात ही कार्यशाळा होणार आहे. बाहेर पडणारा मुसळधार पाऊस, छान सुटलेला वारा आणि मांडवाखाली बसून गरम गरम चहाचा घोट घेत एकमेकांशी गप्पा मारत आकार घेणारी गोधडी हे सारे अनुभवायचे असेल, तर या कार्यशाळेसाठी नोंदणी करावी.

अर्थातच ही कार्यशाळा सशुल्क आहे. मात्र राहण्याची व्यवस्था अत्यंत साधी, तरीही खूपच आरामदायक असेल.
शाकाहारी भोजनाची व्यवस्था केली जाईल. मात्र मांसाहारी भोजन हवे असेल, तर मागणीनुसार तशी व्यवस्था केली जाईल.

कार्यशाळेच्या तारखा अशा :
१) ४ जून आणि ५ जून
२) ११ जून आणि १२ जून
३) १८ आणि १९ जून
४) २५ आणि २६ जून

आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पत्ता असा –
श्री. तुषार केळकर,
मु. उद्धर, पोस्ट खवली, ता. : सुधागड जिल्हा : रायगड

नोंदणी शुल्क आणि अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक –
9545675871 किंवा 9175116381.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply