चिपळूण : येथील दिशान्तर सामाजिक संस्थेने घेतलेल्या पुढाकारातून खांदाट (ता. चिपळूण) येथील वैतरणा नदीवर पाच कोटी लिटर क्षमतेच्या सिमेंट काँक्रीट बंधार्याची निर्मिती करण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रातून वाहणार्या वैतरणा नदीवर गावासाठी पाणी उपसा केंद्र भागात ११० फूट लांबीचा आणि ८ फूट खोलीचा सिमेंट काँक्रीट बंधारा बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे जमिनीखाली यासाठी मोठे खोदकाम करून स्टील बांधणीने हा बंधारा भक्कम करण्यात आला आहे. बंधार्याचे लोकार्पण दिशान्तरचे अध्यक्ष राजेश जोष्टे यांच्याहस्ते करण्यात आले.
कोकण वगळून उर्वरित महाराष्ट्रासह इतर राज्यांना पाणी देण्यापूर्वी कोकणी जनतेला तहानलेले ठेवून कोकणातील पाणी इतर ठिकाणी वळवता येणार नाही, असे प्रतिपादन दिशान्तर अध्यक्ष राजेश जोष्टे यांनी यावेळी केले. जलसमृद्धी ही आर्थिक समृद्धी आणते. यामुळे नागरिकांनी कृतिशील व्हावे. ग्रामविकासात पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या सचिव सीमा यादव यांनी केले.
दिशान्तर संस्थेने यापूर्वी देवखेरकी, ओवळी, कामथे, मांडवखरी, वेहेळे येथे पिण्याचे पाणी आणि शेती प्रकल्पांसाठी यशस्वी जलव्यवस्थापन केले आहे. त्यामध्ये कूपनलिका, विहीर, पाणी टाक्या, नदीवर आरसीसी बंधारे इत्यादींचा समावेश आहे.
खांदाटपली येथील कार्यक्रमास संस्थेचे नितीन यादव, राधाकृष्ण मंदिर समितीचे सीताराम खेडेकर, संजय खेडेकर, राजेंद्र तटकरे, रवींद्र खेडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल तटकरी यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड