अविनाश फणसेकर यांच्या भगवान गौतम बुद्ध नाट्यसंहितेचे थाटात प्रकाशन

मुंबई : रत्नागिरीचे रंगकर्मी आणि प्रतिभावान लेखक (कै.) अविनाश फणसेकर यांनी लिहिलेल्या ‘भगवान गौतम बुद्ध’ या नाटकाच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन महापरिनिर्वाण दिनी साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या हस्ते मुंबईत झाले.

वांद्रे (पश्चिम) येथील ग्रंथाली प्रतिभांगण येथे हा कार्यक्रम उत्साहात झाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आनंदराव खरात आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भगवान गौतम बुद्ध या नाटकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करताना साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार. डावीकडून गायिका योजना शिवानंद, आनंदराव खरात आणि सुदेश हिंगलासपूरकर. सोबत उपस्थित श्रोतृवर्ग.

यानिमित्ताने गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणारी गझलसम्राट सुरेश भट यांनी लिहिलेली आणि पं. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली गीते अनन्या गोखले आणि योजना शिवानंद यांनी सादर केली. त्यानंतर योजना शिवानंद यांनी याच नाटकात ४० वर्षांपूर्वी साकारलेली यशोधरा ही भूमिका रसिकांना व्हिडीओद्वारा दाखविण्यात आली.

विचारवंत, प्रतिभावान साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील अप्रतिम भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. आनंदराव खरात, मराठीच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. मीना गोखले यांनीही मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले.

जगाला अहिंसा आणि शांततेचा महान संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या जीवन तत्त्वज्ञानावरील ही नाट्यकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथावर आधारित आहे. या नाटकाच्या पुस्तकाला लेखक प्रल्हाद जाधव यांनी प्रस्तावना लिहिली. या नाटकाच्या निर्मितीतील रत्नागिरीतील योजना प्रतिष्ठानचे संस्थापक अशोकराज भाट्ये, लेखन-संकल्पना करणारे अरुणोदय भाटकर आणि लेखक अविनाश फणसेकर या त्रयीच्या स्मृतीला ही नाट्यकृती अर्पण करत असल्याचे योजना शिवानंद यांनी सांगितले. या सोहळ्याला बँक ऑफ इंडिया आणि एनकेजीएसबी को ऑपरेटिव्ह बँकेचे आणि विविध मान्यवरांचे सहकार्य लाभल्याबद्दल आणि रत्नागिरीतील सर्व प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांचे आभार मानण्यात आले.

सिद्धार्थच्या भूमिकेत डॉ. नितीश भारद्वाज आणि यशोधरेच्या भूमिकेत योजना शिवानंद

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply