Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

चिपळूण लोककला महोत्सवाच्या लोगोचे अनावरण

Advertisements

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाच्या लोगोचे (मानचित्र) अनावरण प्रसिद्ध उद्योजक, वाशिष्ठी डेअरीचे संचालक प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले.

वाचनालयाचे कलादालन असलेल्या लोककला महोत्सव कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, संचालक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर, विनायक ओक उपस्थित होते. यादव यांनी यावेळी वाचनालयाच्या उपक्रमांचे कौतुक केले. वाचनालयाने कोकणातील जनसामान्यांना सुजाण करण्यासाठी योगदान दिले आहे. आपली संस्कृती, परंपरा, लोककला यांची जोपासना व्हावी, आजच्या पिढीला ती समजावी, यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

असंख्य जाणत्या कार्यकर्त्यांच्या बळावर वाचनालय असे उपक्रम यशस्वी करत असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी नमूद केले. सर्वांच्या सहकार्याने आपण हाही महोत्सव यशस्वी करू या, असे आवाहन त्यांनी अध्यक्षीय मनोगतात केले. धीरज वाटेकर यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद करताना कोकणातील लोकसंस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृती या पर्यटनाशी जोडली जाण्याची प्रक्रिया कोकण पर्यटन बारमाही बहरण्यासाठी पूरक ठरेल, असा आशावाद व्यक्त केला.

महोत्सवाचा लोगो साकारणारे निरंजन संतोष केतकर यांचा यावेळी प्रशांत यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, ज्येष्ठ कवी आणि समीक्षक अरुण इंगवले, शाहीर राष्ट्रपाल सावंत, सुनील खेडेकर, कैसर देसाई, रूपेश आवले, स्नेहा ओतारी आदी उपस्थित होते. मनीषा दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विनायक ओक यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version