दापोली : मुरूड (ता. दापोली) येथे कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.
मुरूड गावातील नाडी तज्ज्ञ कै. नागूअण्णा बिवलकर यांची आयुर्वेद चिकित्सा आणि नाडी परीक्षा भारतातील अनेक राज्यांत प्रसिद्ध होती. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गावातील एन. के. वराडकर हायस्कूलमध्ये करण्यात आले.
शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, स्त्रीरोग तपासणी, हिमोग्लोबिन टेस्ट आणि सामान्य चिकित्सा इत्यादी प्रकारच्या आरोग्य तपासणीचा समावेश होता. डॉ. सौ. धामणकर, डॉ. पिलणकर, डॉ. सौ. गरंडे, डॉ. राठोड तसेच एचबी टेस्टिंगसाठी सूरज शिगवण आणि त्यांचे सहकारी या सर्वांनी शिबिरात रुग्णांना मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहिर महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले की ज्यांची जयंती आहे, ते नागूअण्णा आणि ज्यांच्या प्रतिष्ठानने कार्यक्रम आयोजित केला ते कृष्णामामा हे दोघेही तन समर्पित, मन समर्पित और यह जीवन समर्पित या भावनेने जगलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्याचा वारसा आपण सर्वजण मिळून पुढे नेऊ.
एन. के. वराडकर हायस्कूलचे संचालक विवेक भावे, संजय भावे, मुख्याध्यापक श्रीमती गारडे, श्री. नरवणकर यांच्यासह गावातील तरुण कार्यकर्ते विराज खोत, अमेय जोशी, सौरभ बोडस, विद्याधर दाबके, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी पवार, प्रणाली माने, किशोर बालेकर, राजेश सासणे, प्रेरणा राठोड, सीए कौस्तुभ दाबके, डॉ. प्रतीक भांबुरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या मदतीने हे शिबिर पार पडले.



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

