पोलीस अधीक्षक कार्यालयात आगळ्या पद्धतीने महिला दिन

रत्नागिरी : जागतिक महिला दिन काल (दि. ८ मार्च) रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगळ्या पद्धतीने साजरा झाला.

महिला आणि बालकांसंबंधी गुन्ह्यांचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने आणि सहृदयतेने करावा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी केले.

जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मंथन सभागृहामध्ये श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते रत्नागिरी पोलीस दलाने विविध न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या अनेक थटल्यांमध्ये गुन्हे शाबीत करण्याकरिता कायदेविषयक साह्य पुरविणाऱ्या तसेच सरकारी पक्षाची बाजू उत्तमरीत्या न्यायालयासमोर मांडण्यास मोलाचे सहकार्य करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मेघना नलावडे ( विशेष सरकारी अभियोक्ता), वर्षा प्रभू (सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता), प्रज्ञा तिवरेकर (विशेष सहायक सरकारी अभियोक्ता) आणि प्रिया लोवलेकर ( कायदे तज्ज्ञ, बाल न्याय मंडळ सदस्या) या चौघींना सन्मानित करण्यात आले. शाल-श्रीफळ, गुलाबाचे रोप आणि प्रशस्तिपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

याशिवाय जिल्ह्यात दाखल असणार्‍या विविध महिलांसंदर्भातील गुन्ह्यांची उकल आणि तपास करण्यात, मुद्देमाल हस्तगत करण्यात, आरोपी पकडण्यात, गुन्हे शाबीत करण्यात तसेच मिळालेले गावठी बॉम्ब नष्ट करण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचाही विशेष गौरव करण्यात आला. त्यांची नावे अशी – वैशाली अडकूर (सपोनि, रत्नागिरी), तेजस्विनी पाटील (मपोनि लांजा), प्राप्ती मंचेकर (सपोनि, बीडीडीएस, रत्नागिरी), गायत्री पाटील (पोउनि, महिला सुरक्षा कक्ष, रत्नागिरी), मुक्ता भोसले (पोउनि, रत्नागिरी), शीतल पाटील (पोउनि, नियंत्रण कक्ष, रत्नागिरी), क्रांती पाटील (पोउनि, जयगड पोलीस ठाणे), पूजा चव्हाण (पोउनि, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे) आणि सुप्रिया मोटे (चिपळूण पोलीस ठाणे).

सत्कार समारंभानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “निर्भया” या महिला विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेमध्ये महिलांसंबंधीचे कायदे, नियम, तरतुदी, विविध शासकीय योजना, उपक्रम, समित्या, संपर्क आणि हेल्पलाइन क्रमांक, घ्यावयाची दक्षता तसेच इतर विशेष माहिती देण्यात आली आहे. ही पुस्तिका जनहितार्थ विनामूल्य वितरित करण्यात येणार आहे.

याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड आणि पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply