मुंबई : रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न तसेच कोकणच्या विकासाची दिशा याविषयी चर्चा करण्यासाठी येत्या शनिवारी (दि. ११ मार्च) जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जन विकास समितीने मुंबईत कोकणवासीयांचा मेळावा आयोजित केला आहे.
दादर पूर्व (नायगाव) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्राध्यापक सुरेंद्र गावस्कर सभागृहात शनिवारी सायंकाळी ५ वाजता हा मेळावा होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली कित्येक वर्षे रखडले आहे. तांत्रिकदृष्ट्या त्रुटी असलेल्या कामामुळे या रस्त्याने आतापर्यंत हजारो लोकांचा बळी घेतला आहे. दुसरीकडे सगळी वाहतूक पुणे-कोल्हापूर मार्गे होत असल्यामुळे कोकणवासीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुळात बांधकामात त्रुटी असल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही अपघातांची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे रस्त्याचे काम वेळीच पूर्ण करण्याबरोबरच सुरक्षित प्रवासासाठी रस्त्याचे ऑडिट करून त्यानुसार रस्त्यातील त्रुटी दूर करण्यात याव्यात. रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झालेले नसल्यामुळे तसेच अपघातांमध्ये झालेले प्राणहानी तसेच वाहतूक पुणे मार्गे होत असल्याने झालेले आर्थिक नुकसान लक्षात घेऊन काम पूर्ण झाल्यानंतरही टोल लावण्यात येऊ नये, अशी मागणी मेळाव्यात करण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात आल्यापासून पुन्हा एकदा राजापूर येथे पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याचा विषय चर्चेत आला आहे. कितीही उपाययोजना केल्या तरी पेट्रोलियम रिफायनरी प्रदूषण करीत राहतात, हा जगभरचा अनुभव आहे. मुंबईतील प्रदूषणाला माहुल येथील रिफायनरी कारणीभूत असल्याच्या मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही ही बाब सिद्ध होते. कोकणातील रिफायनरी कितीही ग्रीन म्हटली तरी याला अपवाद राहणार नाही.
सगळे जग आज पेट्रोल-डिझेलमुळे होणारे प्रदूषण आणि तापमानवाढीमुळे विजेच्या वाहनांकडे वळत आहे. भारत सरकारनेही २०३० सालापासून सर्व नवीन वाहने विजेवरच चालणारी असतील, असे जाहीर केले आहे. सध्या भारतात गरजेपेक्षा अधिक पेट्रोलियम शुद्धीकरणाची क्षमता असल्यामुळे भविष्यात ही रिफायनरी देशाच्या गळ्यातील धोंडच ठरण्याची शक्यता आहे. जैतापूर प्रकल्पाबाबतही हीच स्थिती आहे. सौरऊर्जा अडीच ते तीन साडेतीन रुपये दराने उपलब्ध होत असताना अणुभट्टीच्या माध्यमातून निर्माण होणारी किमान दहा रुपये दराची वीज कोण विकत घेणार आहे, असा सवाल करून हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची मागणी जनता दल व कोकण जनविकास समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विरोधातील लढा केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण कोकणातून त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न कोकण जन विकास समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोकणातील कातळाच्या सड्यांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.
याच्याच जोडीला कोकणच्या विकासाची दिशा कोणती असावी, पर्यावरणाचा समतोल सांभाळून कोणते उद्योग-व्यवसाय कोकणात आणता येतील, कोकणातील दारिद्र्य संपविण्यासाठी काय करायला हवे, याचा विचारही यावेळी केला जाणार आहे. कोकणात केवळ स्थानिक पातळीवर दुधाचे पुरेसे उत्पादन करता आले, तरी किमान ५० हजार कुटुंबांना रोजगार मिळेल यासाठी घरोघरी शेततळ्यासारख्या कल्पना राबविण्याची मागणी आणि त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी १०० कार्यकर्त्यांची टीमच कोकण जन विकास समितीच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे.
कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जनता दलाचे प्रभाकर नारकर, जगदीश नलावडे, संजय परब, केतन कदम तसेच कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम, प्रकाश लवेकर आदींनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

