संज्योक्ती सुर्वे, विद्या पटवर्धन यांना बोडस ट्रस्टचे पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रत्नागिरी शहरातील विद्या मधुकर पटवर्धन यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार, तर सौ. संज्योक्ती संजय सुर्वे यांना कार्यगौरव पुरस्कार आज महिला दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.

गेली १० वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती आणि विशेष कार्य करणाऱ्या संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने २०२२ चे कर्तव्यनिष्ठा आणि कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पाच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रथमच एका वर्षी तीन महिलांना सन्मानित करण्यात येत आहे.

कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र आणि एक पुस्तक, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र आणि ३ हजार रुपये असे आहे.

रत्नागिरीत सुमारे चार दशके अग्निहोत्रविषयक कार्य करणाऱ्या आणि कर्मयोगिनी अशी ओळख असलेल्या विद्या मधुकर पटवर्धन आणि व्यसनमुक्त गाव तुरळ (संगमेश्वर) येथील सामजिक कार्यकर्ते कृष्णा गुणाजी हरेकर यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील शिरोडा (तालुका वेंगुर्ले) येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयातील कलाशिक्षक बाळासाहेब आबाजी पाटील, मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आणि तीन बंदरांत थेट जहाजावर जाऊन काम करणाऱ्या पहिल्या महिला अशा रत्नागिरी शहरातील अष्टपैलू सौ. संज्योक्ती संजय सुर्वे, भिंगळोली (ता. मंडणगड) येथे ग्रामीण भागातून सलग पाच वर्षे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त अल्पबचत गोळा करणाऱ्या सौ. नीलम माधव जोशी आणि पाणथळ आणि पडीक जमिनीत उन्हाळी शेतीचा यशस्वी प्रयोग गेली २१ वर्षे करणारे चिंचघर-प्रभुवाडी (ता.खेड) येथील संजय सखाराम पायरे यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कारप्राप्त सहा व्यक्तींपैकी रत्नागिरी शहराबाहेरील तीन व्यक्तींना पुरस्काराची रक्कम बँक ट्रान्स्फरच्या माध्यमातून दिली जाणार आहे. रत्नागिरी शहराबाहेरील चार सन्मानितांची सन्मानपत्रे रजिस्टर पोस्टाने पाठवली जाणार आहेत, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲड. सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळविले आहे.

मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आणि तीन बंदरांत थेट जहाजावर जाऊन काम करणाऱ्या पहिल्या महिला सौ. संज्योक्ती संजय सुर्वे यांना कार्यगौरव पुरस्कार, तर विद्या मधुकर पटवर्धन यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्कार आज बोडस ट्रस्टतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला. बोडस ट्रस्टतर्फे प्रा. उदय बोडस यांनी हे पुरस्कार प्रदान केले.

सन्मानितांचा परिचय

विद्या मधुकर पटवर्धन : राष्ट्रसेविका समितीच्या सुमारे ३४ वर्षे सचिव असलेल्या विद्याताई या सुरुचि महिला उद्योग केंद्राच्या अध्यक्ष, तसेच रेणुका प्रतिष्ठानच्या विश्वस्त होत्या. घरात सुमारे ४२ वर्षे अग्निहोत्र उपक्रम चालविताना त्यांनी जिल्ह्यासाठी प्रमुख साहित्य पुरवठा केंद्र चालवले आहे. अनेक भगिनींना आधार देताना त्या हळदीकुंकू कार्यक्रमातून समाजप्रबोधन करत असतात. यापूर्वी त्यांना रत्नागिरी नगरपालिका, टिळक आळी महिला मंडळ, चित्पावन ब्राह्मण संघ, पावसचे स्वामी स्वरूपानंद मंडळ यांचे पुरस्कार मिळाले आहेत.

कृष्णा गुणाजी हरेकर : सन १९८० पासून तुरळ (तालुका संगमेश्वर) हे गाव व्यसनमुक्त करण्यासाठी गावकर बाबू रावजी तळेकर यांनी पुढाकार घेतला होता. गेली ४३ वर्षे हे गाव व्यसनमुक्त आहे. त्याच मार्गावर चालताना कृष्णा गुणाजी हरेकर सुमारे १५ वर्षे नमन आणि खेळे या लोककलांचे संवर्धन करत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती प्रशस्तीपत्र मिळाले आहे. ते कुणबी समाज आणि ओबीसी समाज तालुकाध्यक्ष आहेत.

बाळासाहेब आबाजी पाटील : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयात कलाशिक्षक आहेत. जी. डी. आर्ट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या पूजा धुरी या कर्णबधिर मुलीला घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते वेगवेगळ्या ४ सेवाभावी संस्थांचे सदस्य असून अपंग सेवा हाच स्वभाव ठरवून दिव्यांगांचे विकासासाठी कार्यरत आहेत. यापूर्वी ते विविध ५ पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

सौ. संज्योक्ती संजय सुर्वे : सुरुवातीला २ वर्षे शिक्षकीपेशात काम केल्यावर १९९२ मध्ये त्यांनी युनायटेड समूहात पदार्पण केले. मरीनर दिलीप भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी, जयगड आणि विजयदुर्ग या ३ बंदरांमध्ये त्यांनी थेट जहाजावर जाऊन काम केले. २००१ मध्ये मरीन सिंडीकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका म्हणून त्यांनी कार्य सुरू केले. कोंकणशिल्प या अनियतकालिकाच्या सहयोगी संपादक, ज्ञानमित्र ट्रस्टच्या सचिव, नंदाई एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त, तसेच सूत्रसंचालिका, व्याख्यात्या आणि मनुष्यबळ विकासासाठी त्या कार्यरत आहेत.

सौ. नीलम माधव जोशी : भिंगळोली (ता. मंडणगड) या ११०० लोकवस्तीच्या गावातून गेली २५ वर्षे अल्पबचत आणि आवर्ती ठेव यांचे कार्य करत आहेत. प्रथम वार्षिक १ लाख इतकेच संकलन करत होत्या. पण २००३ नंतर स्वेच्छानिवृत्तीनंतर जोमाने काम करताना गेली सलग ५ वर्षे १ कोटी रुपयांची अल्पबचत आणि आवर्त ठेव त्यांनी जमा केली आहे, पती माधव जोशी, टपाल खात्यातील कर्मचारी आणि शासकीय कर्मचारी यांच्यासोबत ग्रामीण जनतेचे चांगले सहकार्य त्यांना लाभत आहे.

संजय सखाराम पायरे : चिंचघर-प्रभूवाडी (ता. खेड) येथील वडिलोपार्जित जमिनीत पुराचे पाणी भरून जमीन पाणथळ झाल्याने २१ वर्षांपूर्वी त्यांनी उन्हाळी शेतीचा प्रयोग सुरू केला. त्यानंतर इतरांची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन उन्हाळी लागवडीसाठी जादा क्षेत्र आणले. बँक ऑफ महाराष्ट्रचे पीक कर्ज आणि कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शिराळी, कारली, वांगी, काकडी, गवार, भेंडी, काळा भोपळा आणि कलिंगड यांची शेती करून लाखोचे उत्पन्न मिळवले. तरुणांना शेतीकडे वळवण्याचे काम ते करत आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply