विठ्ठला महाकाळ यांचे आकस्मिक निधन; कला, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ गावचे सुपुत्र विठ्ठला महाकाळ यांचे शनिवारी (४ मार्च २०२३) रत्नागिरीतील राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. शासनाच्या कृषी विभागात असताना त्यांनी इतरही विविध क्षेत्रांत कार्य केले आणि त्यातून अनेक संस्था निर्माण झाल्या. ते राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे संघटक होते. कला, नाट्य, साहित्य, तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे बहुमोल योगदान होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे सर्वांना धक्का बसला असून, कुटुंबीयांवर, तसंच त्यांच्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना, बहर, प्रहर, क्षमर ही तीन मुले, तीन सुना व तीन नातवंडे असा परिवार आहे.

विठ्ठला महाकाळ यांनी ‘कर्मचारी मित्र’ या मासिकासाठी कार्यकारी संपादक म्हणून अनेक वर्षे काम केले. भोई समाजाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते, सल्लागार, मार्गदर्शक होते. अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद त्यांनी बराच काळ भूषविले होते. तसेच जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजाला एकत्रित आण्यासाठी त्यांनी रत्नागिरी जिल्हा एनटी वेल्फेअर असोसिएशनची स्थापना केली. त्यांनी बजरंग कला निकेतन कलामंचाची स्थापना करून आगरनरळ गावामध्ये सांस्कृतिक माध्यम उभे केले. त्या माध्यमातून गावाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाला चालना दिली. नाट्य, कला, साहित्य क्षेत्रातही ते कार्यरत होते. त्यांचे लेखन अनेक वृत्तपत्रे व मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या प्रभावी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना मोठा मित्रपरिवार लाभला.

विठ्ठला महाकाळ यांच्या पार्थिवावर आगरनरळ या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धाराचा संकल्प त्यांनी केला होता आणि त्या संकल्पाची पूर्ती झाली म्हणून त्यांचे पार्थिव त्या मंदिराच्या ठिकाणी नेऊन, तसंच त्यांनी स्वतः लिहिलेल्या नांदीचे गायन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अंत्ययात्रेला मित्रपरिवार, आप्तेष्ट, सहकारी कर्मचारी, विविध समाजांतील समाज बांधवांनी उपस्थित राहून त्यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. आगरनरळ या गावीच १३ मार्च रोजी त्यांचा दशक्रिया विधी होणार असून, १५ मार्च रोजी बारावे-तेरावे हे विधी होणार आहेत, असे त्यांच्या कुटुंबीयांनी कळवले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply