रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन, कलांगण-संगमेश्वर आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेल्या तिसऱ्या सायक्लोथॉन पर्वात चिपळूणचे विक्रांत आलेकर विजेते ठरले. अवघ्या १ तास ३३ मिनिटांत त्यांनी ४२ किमीचे अंतर पार केले. आलेकर बंधूंनी सलग तिसऱ्या वर्षी क्रमांक पटकावून स्पर्धा गाजवली.

एकही खड्डा नसलेला रस्ता, वळण, उतार आणि चढावांचा घाट तसेच सपाट रस्ता असलेल्या संगमेश्वर बसस्थानक ते देवळे या मार्गावर ही अतिशय दर्जेदार स्पर्धा ५ मार्च रोजी झाली. देवळे येथे रंगावधूत महाराजांच्या मठापर्यंत निघालेल्या पेडल फॉर स्पिरिच्युअॅलिटी सायक्लोथॉनमध्ये जिल्ह्यासह महाराष्ट्रातून ८५ जणांनी भाग घेतला. संगमेश्वर एसटी स्टॅंड येथे स्पर्धेचे उद्घाटन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले. याप्रसंगी सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी, निबंध कानिटकर, युयुत्सु आर्ते, सुहास ठाकुरदेसाई यांच्यासह सायकलिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत पुण्यातील आकाश लकेश्री आणि सांगलीतील संतोष शिंदे यांनी काही सेकंदांच्या फरकाने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ४० वर्षांवरील गटामध्ये अनंत तानकर (गुहागर), मिलिंद खानविलकर (दापोली), डॉ. तेजानंद गणपत्ये (चिपळूण) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. महिलांच्या गटामध्ये हर्षदा कुलकर्णी (रत्नागिरी), आरती दामले (रत्नागिरी) आणि अन्वयी बापट (चिपळूण) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.
स्पर्धा संपल्यानंतर देवळे गावात सायकलस्वार गेले. त्यावेळी कानडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावात सर्व सायकलस्वारांची वाजत गाजत मिरवणूक काढली. या वातावरणाने अवघे देवळे गाव सायकलमय झाले. बक्षीस वितरण समारंभ रंगावधूत महाराज मठाच्या आवारात झाला. यावेळी नीलेश कोळवणकर, अॅड. प्रफुल्ल साळवी, गजानन काळोखे, उदय लोध, कौस्तुभ सावंत, सदाशिव करकरे, नामदेव सरपोतदार, वासुदेव सरदेसाई, मोघे गुरुजी, दिलीप लिंगायत, राजेंद्र मावळंकर, श्री. सरदेसाई, सुबोध करकरे, प्रबोध आठल्ये, युयुत्सु आर्ते, प्रमोद हर्डीकर, महेंद्र चाळके, रंजना कदम, भाई भोसले, अण्णा बेर्डे आदी उपस्थित होते.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पहिल्या वर्षी सायक्लोथॉन हेदवी ते गणपतीपुळे, दुसऱ्या वर्षी रत्नागिरी ते चाफे कातळशिल्प आणि यंदा आध्यात्मिक प्रचारासाठी सायक्लोथॉन आयोजित केली. यंदाच्या स्पर्धेत ११ ते ७२ वयोगटातील महिला, पुरुषांनी भाग घेतला. सायकल गौरव पुरस्कार प्राप्त विनायक वैद्य यांनी सायक्लोथॉनमध्ये विशेष सहभाग घेत सर्वांना प्रोत्साहन दिले. दरवर्षीप्रमाणे दापोलीच्या प्रशांत पालवणकर यांनी गिअर सायकलिस्टना टक्कर देत नॉनगिअर सायकलने हे अंतर पार केले. विनोद केतकर यांनीही या स्पर्धेत साध्या सायकलवर भाग घेत यशस्वी सहभाग घेतला.
यंदा प्रथमच सुवर्णसूर्य फाउंडेशनने सायकल प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्तींना सायकलदूत नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. यामध्ये प्रसाद आलेकर, श्रद्धा रहाटे, गजानन भातडे, नीलेश शाह, प्रशांत पालवणकर आदींचा समावेश होता. डबल एसआर (सुपर रॅंडोनिअर) अमित कवितके यांचा गौरव केला.
पहिल्या वर्षीपासून सायक्लोथॉनवर आलेकर बंधूंनी वर्चस्व गाजवले आहे. चिपळुणातील विक्रांत व प्रसाद या दोघा बंधूंनी तिन्ही वर्षे पहिला क्रमांक सोडला नाही. यावेळच्या स्पर्धेत आकाश व सांगलीच्या शिंदे यांनी आलेकर बंधूंसोबत सायकलिंग करत आव्हान दिले. परंतु अनुभवी व कसबी आलेकर बंधूंनी पहिला व चौथा क्रमांक या स्पर्धेत पटकावला.
स्पर्धेचे सुयोग्य नियोजन प्रसाद देवस्थळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रत्नागिरी सायकिलस्ट क्लबच्या सदस्यांनी चोख व्यवस्था ठेवल्याने स्पर्धकांनी खूप कौतुक केले. यशस्वीतेसाठी हॉटेल श्रद्धा धामणी, गोळवली गोशाळा प्रकल्प, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, राज मंडप डेकोरेटर्स, रत्नागिरी लायन्स क्लब, संगमेश्वर लायन्स क्लब, ओम प्रमोद ज्वेलर्स, आकार ऑर्गनायझेशन, कोकण प्रॉपर्टी एक्स्पो श्री. खामकर, प्राचीन कोकणचे वैभव सरदेसाई, जिल्हा शासकीय रुग्णालय, संगमेश्वर व साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र, युयुत्सु आर्ते, नीलेश चव्हाण, देवळे ग्रामपंचायत, गावप्रमुख, ग्रामस्थांनी सहकार्य केले. स्पर्धेत चार हायड्रेशन पॉइंट ठेवले होते. तेथे पाणी व एनर्जी ड्रिंक, केळी, चिक्कीचे वितरण कार्यकर्त्यांनी केले. रुग्णवाहिका, सपोर्ट व्हेईकलची सुविधा उपलब्ध होती. सर्व स्पर्धा कोणत्याही अडचणीविना सुरेख झाली.


वासुदेवानंद सरस्वतींचे अनुग्रहित श्रीरंगावधूत महाराज

दत्त संप्रदायातील थोरले महाराज म्हणून ओळखले जाणारे वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांचे श्रीरंगावधूत महाराज शिष्य होते. पण हे शिष्यत्वही अलौकिक होते.
श्रीरंग अवधूत महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे. देवळे (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील विठ्ठलपंत वळामे धर्मपरायण, वेदपरायण व दशग्रंथी विद्वान् ब्राह्मण होते. सखारामपंत सरपोतदार यांच्या विठ्ठलमंदिरातील नियमित देवपूजेसाठी ते देवळे या आपल्या गावाहून गुजारातमधील गोध्रा शहरात गेले. तेथेच पांडुरंग यांचा २१ नोव्हेंबर १८९८ रोजी जन्म झाला. पण त्यानंतर अल्पावधीतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे कुटुंब देवळे या गावी परतले. वयाच्या आठव्या वर्षी तेथेच पांडुरंग यांचा व्रतबंध झाला. उपनयनविधीनंतर ते श्रीनृसिंहवाडीला श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या दर्शनाला आले. १९०६ साली ही भेट घडली. त्यानंतर त्यांची टेंब्ये स्वामींशी कधीच प्रत्यक्ष भेट झाली नाही. मात्र पहिल्याच भेटीत श्रीटेंब्ये स्वामी म्हणाले, ‘हा बाळ तर आमचाच आहे.’ आणि ते त्यांचे शिष्य बनले.
नंतर तेही गुजरातमध्ये नारेश्वर येथे गेले. तेच त्यांचे कार्यक्षेत्र ठरले. जवळच असलेल्या गरुडेश्वर येथे टेंब्ये स्वामी समाधिस्थ झाले. त्यांच्याच छत्रछायेत श्रीरंगावधूत महाराजांच्या कार्याचा विस्तार झाला. त्यांची बुद्धी तेजस्वी होती, स्मरणशक्ती तीव्र होती. मराठी, गुजराती, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. विसाव्या वर्षी गृहत्याग करून त्यांनी दत्तप्रसार सुरू केल्यावर कधीही त्यांनी धन, द्रव्य घेतले नाही. कोणी पैसे ठेवले, तर ते सबंध दिवस उपवास करत. त्यांनी कधीही भाषण, प्रवचन केले नाही. आपल्या कृतीमधून त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. आपला अंतकाल जवळ आल्याची चाहूल लागल्यानंतरच जणू त्यांनी हरिद्वारला प्रयाण केले आणि तेथेच त्यांनी १९ नोव्हेंबर १९६८ रोजी देह ठेवला. त्यांची समाधी मात्र त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नारेश्वर येथे आहे.
अशा श्री रंग अवधूत स्वामींच्या जन्मस्थळी पेडल फॉर स्पिरिच्युअलिटीच्या माध्यमातून पाच मार्च रोजी सायकलप्रेमी पोहोचले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

