रत्नागिरी : पूर्णपणे हर्बल द्रव्ये वापरून तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकीनचे उत्पादन केंद्र हरचिरी (ता. रत्नागिरी) येथे सुरू झाले. विशेष बाब म्हणजे ही पॅड्स विघटनाद्वारे पर्यावरणात मिसळून जाणारी आहेत.
मानवी जीवनात वाढलेला रसायनांचा वापर आणि पर्यावरण संतुलन हा मुद्दा अलीकडे अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर हे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. बँक ऑफ इंडियाच्या चांदेराई शाखेच्या व्यवस्थापक प्रतिमा जाधव यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
हा उपक्रम हरचिरी गावच्या रहिवासी रश्मी प्रभुदेसाई यांनी सुरू केला आहे. त्या म्हणाल्या की, विविध रसायनांच्या वापरामुळे अनेक महिलांवर पॅड्सच्या वापराचे दुष्परिणाम दिसून येतात. यासाठी हर्बल द्रव्य वापरून सॅनिटरी पॅड्स तयार करण्याचा मुद्दा माझ्या डोळ्यांसमोर अनेक वर्षे होता. आता तो साकारत आहे. हे पॅडस् विघटनशील असून पर्यावरणात ते सहजपणे सामावले जाऊ शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या पॅड्समध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असतो. त्यामुळे त्यांच्या वापरापासून शरीराला हानी पोहोचू शकते. शिवाय पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण होतो. पण हरचेरी येथे तयार करण्यात आलेल्या पॅडमध्ये पूर्णपणे कापडाचा वापर केलेला आहे. ती कृत्रिम रंगविरहित आहेत. शिवाय त्यांचे मातीमध्ये सहज विघटन होते. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना वापरण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा रीतीने पॅड्सची निर्मिती करण्यात आली आहे. महिलांना त्याचा लाभ नक्की होईल. रत्नागिरी जिल्ह्यात अशा स्वरूपाचा हा पहिलाच उद्योग असावा, असेही त्यांनी नमूद केले.
उद्घाटन समारंभाला डॉ. श्रृती ठाकूर, डॉ. शरद प्रभुदेसाई, प्रतिभा प्रभुदेसाई, अॅड. अकल्पिता चक्रदेव, रोहित भुरवणे, उद्योजिका जान्हवी भुरवणे, नर्सरी उद्योजक विनोद प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
हर्बल सॅनिटरी पॅड्सची उपलब्धता
ही सॅनिटरी पॅड्स सध्या प्रायोगिक स्वरूपात तयार करण्यात आली असून व्यावसायिकदृष्ट्या पॅकिंग आणि अन्य व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती सौ. रश्मी प्रभुदेसाई यांनी दिली. त्या म्हणाल्या की, सध्या विविध तीन आकारांमध्ये ७ ते १२ पॅड्सचे पॅकेट उपलब्ध आहे. त्यांची किंमत ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहे. व्यावसायिक स्वरूपात अजून पॅड्सची विक्री व्यवस्था सुरू केलेली नाही. मात्र रत्नागिरीत फाटक प्रशालेजवळ पल्लवी मेहेंदळे यांच्याकडे पॅड्स उपलब्ध आहेत.
अधिक माहिती आणि संपर्कासाठी –
सौ. रश्मी प्रभुदेसाई – 99698 16532
ईमेल- rashmi.prabhudesai79@gmail.com
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड