पुस्तकांच्या गुढीला साहित्यिक भरभराटीचे गाऱ्हाणे

रत्नागिरी : हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला आज (दि. २१ मार्च) रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे चौथ्या वर्षी उभारण्यात आलेल्या पुस्तकांच्या गुढीला साहित्यिक भरभराटीचे गाऱ्हाणे घालण्यात आले.

जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात पुस्तकांची माळ असलेली साहित्यिक गुढी उभारण्यात आली. गुढीचे खास आकर्षण असलेल्या साहित्य पताका लावण्यात आल्या. ग्रंथालयाचे वाचक श्रीनिवास सरपोतदार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध विषयांवर साहित्य पताका तयार केल्या जातात. यावर्षी श्री. सरपोतदार यांनी नामवंत लेखकांच्या साहित्यातील मोजके शब्द लिहून त्यांची चित्रे रेखाटली आहेत.

वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, डॉ. शरद प्रभुदेसाई, सु. द. भडभडे, सौ. मेघा कुलकर्णी, पत्रकार प्रमोद कोनकर, कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे नारायण महादेव नानिवडेकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे आदी मान्यवरांच्या हस्ते गुढीपूजन आणि ग्रंथपूजन करण्यात आले.

गुढीपूजेनंतर संगमेश्वरी बोलीभाषेतील लेखक अमोल पालये यांनी प्रास्ताविक केले. शालिवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या सहा हजार सैनिकांचे पुतळे तयार केले. त्यामध्ये प्राण फुंकून त्यांच्या साह्याने शकांचा पराभव केला. तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता. शालिवाहनाने मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजामध्ये चैतन्य, स्वाभिमान आणि अस्मिता जागृत केली, असा त्याचा तर्कसुसंगत अर्थ आहे. हाच अर्थ अभिप्रेत धरून साहित्यिक गुढी उभारण्यात आली आहे. कोकणच्या साहित्य निर्मितीला आलेली मरगळ दूर होऊन सकस साहित्यनिर्मिती व्हावी, हा त्याचा उद्देश आहे.

शालिवाहनाच्या पराक्रमाच्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला शालिवाहन शक अशी सुरू करण्यात आली. ज्याने विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते शक अशा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ या संज्ञेमध्ये झाला आहे. यानिमित्त अवघ्या महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. नव्याची सुरुवात आणि नव्याची निर्मिती, असा या सणाचा सोपा अर्थ आहे. त्याअनुषंगाने मराठी साहित्य विश्वात नव्याची निर्मिती व्हावी, वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी नेहमीच कटीबद्ध असलेल्या जनसेवा ग्रंथालयातर्फे साहित्यिक गुढी उभारण्यात आली आहे. साहित्य विश्वातील हा आगळा-वेगळा असा उपक्रम आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर कोकणातील साहित्य चळवळीला ऊर्जितावस्था लाभावी, नवनवे साहित्यिक निर्माण होऊन सकस साहित्य निर्मिती व्हावी, या उद्देशाने साहित्यपुरुषाला गार्‍हाणे घातले. ते असे,

..जनसेवावाल्यांनी आज साहित्याची गुडी उबी केल्यानी हाय… पुस्तकांशी नाती सांगनारी ही सगली तुजी प्वारा-बाला, मुलामानसा, जनसेवाचं गावकरी, मानकरी, कामकरी आज तुमच्याम्होरx जमलीलं हायतं… लोकानंला शिकून सवरून शानीसुरती करयाचा तेंनी वसा घेतलांनी हाय.. उतनार नाय, मातनार नाय.. घेतला वसा टाकनार नाय.. आशी पदराला गाट बांदून आज जनसेवालं साहत्याची, पुस्तकांची, लोकांची शेवा करीत आलीलं हायतं… तेंच्या कारयात तेंनला यास देस.. वाचकांचो आशीरवाद तेंनला भरभरानं मिलानं दे.. तेंचा पिरेम तेंनला लाभानं दे.. वाचकांचो आनी तेंचो गोडीगुलाबेंचो सवसार नांदू दे.. इचार-इचारांनी ती सगली मंडली यकटयं नांदून वाचनसंस्कृतीची गुढी गगनात फडकानं दे रं साहित्यपुरषा म्हाराजा..

बा साहित्यपुरषां म्हाराजा, उबा र्‍हा.. आज व्हया टिकानी साहित्याची गुढी उबारलीली हाय.. साहित्याचा तोरानं बांदलीला हाय.. पुस्तकांची पुंजा केलीली हाय.. ती मान्य करून घे. वाचनान्याला ढिगभर पुस्तकाचा वाचयाची वांशा देस.. लिवनार्‍यांच्या हातात ताकत देस.. बोलनार्‍याच्या त्वांडार सरस्वती नाचनं दे.. असा सगला बरा करून वडाची साल पिपलाक लाव.. उलट्याचा सरल कर.. अनी साहित्याची, वाचनाची गोडी लाव रे म्हाराजा..!

जनसेवा ग्रंथालयाने उभारलेल्या गुढीप्रमाणे वाचनसंस्कृतीची गुढी गगनात फडकू दे आणि रत्नागिरीच्या साहित्याचा झेंडा जगभर पोहोचू दे, अशी विनवणी या गाऱ्हाण्यातून त्यांनी केली. सर्वांनी त्यांना होय महाराजा म्हणून साथ दिली.

रत्नागिरीत नव्यानेच राहायला आलेल्या सौ. मेघा कुलकर्णी यांनी यावेळी आपली कविता सादर केली.

गुढी उभारल्यानंतर मराठी साहित्याचा पाया रचणार्‍या संत साहित्याच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, आणि उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला आभा घाणेकर, ग्रंथपाल सिनकर, सुजाता कोळंबेकर, सौ. भोसले, आशा पाटणे आदी नागरिक, वाचक, सभासद उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply