Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

बिग फूट संग्रहालयाची अविस्मरणीय सफर

Advertisements

जागतिक संग्रहालय दिनानिमित्ताने दक्षिण गोव्यातील मडगावजवळील लोटोली गावातील सुप्रसिद्ध बिग फूट संग्रहालयाला कुटुंबीयांसह भेट दिली. ती अविस्मरणीय ठरली.
…….

जगभरात १८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिवस म्हणून १९७७ सालापासून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय कौन्सिलमार्फत जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील देशांचा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत असतो. या कार्यक्रमात अनेक ऐतिहासिक तसेच विचित्र गोष्टींचेसुद्धा प्रदर्शन पाहायला मिळते. भारतातसुद्धा अनेक संग्रहालये आहेत, परंतु त्यातील काही संग्रहालयांची आपल्याला माहितीसुद्धा नसते. असेच एक संग्रहालय गोव्यातील मडगावजवळच्या लोटोली गावात आहे. या बिग फूट संग्रहालयाला संग्रहालय दिनीच भेट देण्याचा योग जुळून आला.

जुन्या काळातील गोमंतकीय जीवनशैली अर्थात गोव्यातील हिंदू-ख्रिश्चन धर्मीयांच्या शेकडो वर्षांच्या साहचर्यातून निर्माण झालेली इथली ग्रामीण, सामाजिक जीवनशैली दाखवणारे अख्खे गावच पुतळ्याच्या माध्यमातून बिग फूट संग्रहालयात उभे करण्यात आले आहे. संग्रहालय फिरताना पर्यटकांना इंग्रजी, हिंदी आणि कोंकणी भाषेत संग्रहालयातील माहिती देण्यासाठी दृक्श्राव्य माध्यमाचा कल्पकतेने उपयोग करण्यात आला आहे. संग्रहालय रोजगार व पर्यटनवृद्धी कसे करू शकते, याचे हे संग्रहालय म्हणजे उत्तम उदाहरण आहे. येथील व्यवस्थापनही उत्तम असल्याने ठिकठिकाणी स्वच्छता आढळते.

सर्जनशील मनाच्या कलाकारांनी कल्पकतेने उभारलेल्या बिग फूट संग्रहालयामागील कथा रोचक आणि अद्भुत असून स्वार्थी आणि व स्वतःपुरत्याच आभासी जगात वावरणाऱ्या आजच्या माणसाला सकारात्मकता आणि मानवता धर्माची ओळख करून देते.

संग्रहालयाच्या मध्यभागी श्रद्धावान पर्यटकांसाटी बिग फूट मंदिराची उभारणी करण्यात आली असून गाभाऱ्यात जाऊन बिग फूटचे दर्शन घेण्याआधी तयार करण्यात आलेल्या सभामंडपात स्क्रीनवर बिग फूट (मोठे पाय) मागील कथा पर्यटकांना दाखविण्यात येते. याची सुंदर मांडणी थक्क करणारी आहे.

या संग्रहालयाचे प्रवर्तक महेंद्र अल्वारीस यांनी जांभ्या दगडात बनवलेले देशातील सर्वांत मोठे आणि सर्वांत जलद बनवलेले संत मीराबाईचे शिल्प, आशियातील एकमेव असे डावखुऱ्यांचे संग्रहालय, गोमांतकीय निसर्ग जीवन, ग्रामीण सामाजिक संस्कृती सर्वच पाहण्यासारखे आहे. एकूणच बिग फूट संग्रहालय पाहणे हा येक आनंददायी अनुभव असून दक्षिण गोव्यात आलेल्या पर्यटकांनी तेथील सुंदर समुद्रकिनारे, मंदिरांना भेट देतानाच लोटोली गावातील बिग फूट संग्रहालयालाही आवर्जून भेट द्यायला हवी. तरच खऱ्या अर्थाने गोमांतकीय समृद्ध जीवनशैलीचा अनुभव घेता येईल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version