रत्नागिरीत योगदिनानिमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रम

रत्नागिरी : येत्या २१ जून रोजी साजरा होणार असलेल्या आठव्या जागतिक योग दिनानिमित्ताने रत्नागिरीत राधाकृष्ण मंदिर, पतंजली योग समिती आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. भारतीय प्राचीन परंपरेचा आणि संस्कृतीचा सर्व देशांमध्ये प्रचार, प्रसार करण्याचे कार्य अनेक भारतीयांनी केले आहे. यामध्ये योगऋषी रामदेवजी महाराज यांचे नाव अग्रस्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २१ जून हा दिवस दरवर्षी सर्व देशांमध्ये जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे. दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. योग दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे आणि ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीत ठिकठिकाणी योग दिन साजरा होणार आहे.

राधाकृष्ण मंदिर

रत्नागिरीच्या राधाकृष्ण मंदिरात श्री दत्तनाद योग कला केंद्रातर्फे जागतिक योगदिन साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ६ ते ७.३० या वेळेत हा कार्यक्रम होईल. राधाकृष्ण मंदिरात गेले तीन वर्षे श्रीकांत ढालकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्ग चालू आहेत. त्यांचे अनेक योगसाधक आता यशस्वी योगशिक्षक झाले आहेत. त्यातील काही योगसाधकांनी योगामधील अधिक परीक्षा देऊन स्वतःचे वर्ग सुरू केले आहेत. त्यांच्यासह इतर योगसाधकांची प्रात्यक्षिके २१ जूनच्या कार्यक्रमात होणार आहेत. ज्यांनी या योगवर्गाला विशेष प्रोत्साहन दिले असे श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, विशेष पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि योगशिक्षिका डॉ. निधी पटवर्धन यावेळी उपस्थित राहणार आहेत. योगशिक्षक श्रीकांत ढालकर यांचे योग प्रबोधन होणार आहे. उत्तम आरोग्य हीच प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वांत खरी संपत्ती आहे. प्रत्येकाच्या स्वभावाला योग हेच सुंदर औषध आहे. तेव्हा उशीर होण्यापूर्वी येऊन सर्वांनी योगाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पतंजली परिवारातर्फे हॉटेल विवेक
जागतिक योगदिनानिमित्त स्वामी रामदेव महाराज प्रणित पतंजली परिवारातर्फे रत्नागिरीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे माळनाका येथील हॉटेल विवेकच्या मैदानावर होणार आहे. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ६ ते ८ या वेळेत कार्यक्रम होणार आहे. जागतिक योग दिनाच्या नियोजित कार्यक्रमानुसार हा कार्यक्रम केला जाणार आहे. यापूर्वी दोन वेळा रामदेवजी महाराज रत्नागिरी दौऱ्यावर येऊन शिबिर आणि महिला मेळाव्यात मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर जिल्ह्यातील योग चळवळीला आणखी चालना मिळाली आहे. यावर्षी पतंजली समितीतर्फे योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमा जोग, भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी मारुती अलकुटे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्यानंद जोग, पतंजली किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी भारत सावंत, महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी सुरेखा शिंदे यांनी केले आहे.

क्रीडा विभागातर्फे छत्रपती शिवाजी क्रीडांगण
योग दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी क्रीडांगणवरील बॅडमिंटन हॉलमध्ये २१ जून रोजी सकाळी ७.३० वा. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्क्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply