विद्यार्थिनी, महिलांसाठी योगदिनी योगासन, सूर्यनमस्कार कार्यशाळा

गीतांजली दिवेकर-टिळक

चिपळूण : अलोरे (ता. चिपळूण) येथील मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय आणि सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने विद्यार्थिनी आणि महिलांसाठी योगदिनी योगासन आणि सूर्यनमस्कार कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचा भाग म्हणून येत्या मंगळवारी (दि. २१) जागतिक योगदिनी, सॉफ्टवेअर इंजिनिअर योगशिक्षिका आणि प्रशालेच्या १९९२ बॅचच्या माजी विद्यार्थिनी गीतांजली दिवेकर-टिळक ‘योगासन आणि सूर्यनमस्कार’ कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी साडेसात ते दहा या वेळेत अलोरे येथील करमणूक केंद्रात होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभर २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. करोनासारख्या महामारीशी लढताना मानसिक आणि शारीरिक बळ योगशास्त्रानेच संपूर्ण विश्वाला दिले होते. योगशास्त्र हे मानवसृष्टी इतके प्राचीन मानले जाते. भारतीय योगविज्ञान ही संपूर्ण विश्वासाठी अमृतमय देणगी आहे. पूर्वी योग ही अवघड साधना आहे, असे वाटायचे. मात्र योग हा सर्वांनीच करण्याचा विषय असल्याचे सिद्ध झाले आहे. योग ही एक जीवनशैली आहे. मनुष्याच्या आहार, विहार आणि आचरणात त्याचा समावेश व्हायला हवा. विद्यार्थी, बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, महिला अशा सर्वस्तरातील व्यक्तींसाठी योगासने हा व्यायाम प्रकार म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीने मनुष्याला दिलेली देणगी आहे. पाश्चात्य देशातील लोकांनी याचे महत्त्व ओळखून त्याचा स्वीकार केला आहे. त्याच्या प्रसाराचे कार्य
गीतांजली दिवेकर-टिळक यांनी हाती घेतले आहे.

त्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवीधारक आहेत. त्या नाशिक येथील योग गुरुकुल केंद्राच्या पदवीधारकही आहेत. प्राणिक हिलिंग या आधुनिक उपचार पद्धतीचे विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. पुण्यातील रुग्णालयांमध्ये त्या समुपदेशन कार्य करतात. पुण्यासह परदेशातील योगसाधकांनाही त्या मार्गदर्शन करीत असतात.

अलोरे शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमाचा भाग म्हणून होणाऱ्या त्यांच्या कार्यशाळेत शाळेच्या विद्यार्थिनींसह पंचक्रोशीतील शासकीय, निमशासकीय नोकरदार महिला, शिक्षिका, बचत गटातील सदस्य महिला, गृहिणी, ग्रामपंचायत महिला सरपंच-उपसरपंच सदस्या, महिला लोकप्रतिनिधी आदी सर्व क्षेत्रांतील महिलांना नि:शुल्क सहभाग घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९०११६३०४९१, ९०११९७९७३४, ७७६८८३३८८६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply