रत्नागिरी : वंध्यत्वनिवारणाच्या महत्त्वाच्या कार्यासाठी येथील डॉ. तोरल नीलेश शिंदे यांचा कोल्हापूर येथे इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रॉडक्शन या संस्थेने सन्मान केला.
महिलांच्या आरोग्यासाठी काम करत असताना कोकणातील ग्रामीण भागातील वंध्यत्वाच्या समस्येची जाणीव झाल्यानंतर त्यासाठी विशेष शिक्षण घेऊन कोकणातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू करून अनेक कुटुंबांच्या घरी डॉ. तोरल नीलेश शिंदे यांनी आनंद वाटला. डॉ. शिंदे यांनी २०१४ साली रत्नागिरीत कोकणातील पहिले रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू करून अनेक महिलांना अपत्यप्राप्तीसाठी एक आशेचा किरण दाखवायला सुरवात केली. तेव्हा अपत्यप्राप्तीसाठी खर्चीक वाटणारी ही उपचार पद्धती रत्नागिरीतील शिवाजीनगर येथील धन्वंतरी रुग्णालयात सुरू करण्यात आली. तेव्हा त्यांनी महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक स्थितीचा प्रामुख्याने त्यांनी विचार केला. या उपचार पद्धतीबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी दोन वर्षे दर महिन्याला रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी मोफत तपासणी शिबिरे आयोजित करून महिलांच्या शंकांचे आणि भीतीचे निरसन केले. टेस्ट ट्यूब बेबी उपचार पद्धतीतील प्रगत उपचार पद्धतीसुद्धा रत्नागिरीमध्ये उपलब्ध करून दिली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आजपर्यंत अनेक घरांमध्ये लहान बाळांच्या रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत. अनेक जोडपी अपत्यप्राप्तीमुळे आनंदी झाली आहेत.
डॉ. तोरल शिंदे यांच्या याच कामाची दखल इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रॉडक्शन या संस्थेने घेतली आणि त्यांचा मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे झालेल्या मोठ्या सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मान केला.
या पुरस्कार सोहळ्याला आयएसएआरच्या अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, डॉ. जिरगे, डॉ. रिनी ठाकर आणि इंग्लंडमधील डॉ. सुलतान उपस्थित होते.Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

