वाहतूक विभागाची जबाबदारी

कोकणातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गाने येणाऱ्या आणि परत जाणाऱ्या चाकरमान्यांना बराच त्रास सहन करावा लागला. महामार्गाची एक मार्गिका सुरू झाल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केलेली घोषणा ऐकायला सुखावह वाटली तरी प्रत्यक्ष प्रवास करताना ती तितकीशी सुखावह नव्हती, याचाही अनुभव चाकरमान्यांनी घेतला, पण लाडक्या गणेशोत्सवाकरिता त्यांनी ते सर्व सहन केले. चाकरमान्यांना जिल्ह्यात आल्यानंतर ठिकठिकाणी आणखी एका मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. ही समस्या म्हणजे रस्त्यावर ठिकठिकाणी बसलेले गाईगुरांचे कळप. कोणतेही शहर किंवा शहरांच्या जवळपासचा ग्रामीण भाग त्याला अपवाद नव्हता. ठिकठिकाणी गुरे मोठ्या कळपांनी रस्त्यांवरच ठाण मांडून होती. काही काळापूर्वीपर्यंत या गुरांना धडकून रात्री अनेक जीवघेणे अपघातही झाले आहेत. पण रस्त्याच्या कडेला जसे माइलस्टोन असतात, तशीच रस्त्यावर गुरे असायचीच, याची खात्री पटल्याने आता अनेक वाहनचालक सावधपणे वाहने चालवतात. पण तरीही मूळ समस्या मात्र कायम आहे. ती सोडवण्याबाबत प्रशासन ढिम्म आहे.

रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी सर्व वाहनचालक वेगवेगळ्या प्रकारचे कर शासनाला भरत असतात. वाहने चालवताना ती सुरक्षितपणे चालवावी, त्यासाठी वाहतूक विभाग आणि वाहतूक पोलीस खूपच खबरदारी घेत असतात. त्यामध्ये चारचाकी वाहनचालकांचा सीटबेल्ट आणि दुचाकीचालकांचे हेल्मेट यावर पोलिसांचे अत्यंत बारकाईने लक्ष असते, पण रस्त्यावर ठिकठिकाणी बसलेले गुरांचे कळप मात्र त्यांना दिसत नाहीत! वास्तविक सर्व तऱ्हेचे कर भरणाऱ्या वाहनचालकांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता मोकळा ठेवणे ही जबाबदारी वाहतूक विभागाची आणि पर्यायाने वाहतूक पोलिसांची आहे. रस्त्यावरची गुरे आम्ही हाकायची का, असा प्रश्न पोलीस करत असतील तर ते साफ चुकीचे आहे. रस्त्यावर एखादा अपघात झाला, दरड कोसळली, झाड कोसळले तर रस्ता मोकळा करण्यासाठी सर्वांत आधी पोलीस तेथे पोहोचतात. याचाच अर्थ वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता मोकळा करणे ही त्यांची जबाबदारी आहे. ती स्वीकारूनच ते रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचत असतात. दरड कोसळल्यास संबंधित बांधकाम विभागाला पाचारण करून रस्ता मोकळा करण्याचे काम पोलीस जबाबदारीने पार पाडतात. त्याच आणि तेवढ्या जबाबदारीने रस्त्यावरची गुरे हाकणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. ती त्यांना कोणीही सांगत नाही, हा मुद्दा आहे.

वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी रस्ता मोकळा ठेवणे ही जबाबदारी वाहतूक विभाग आणि पोलीस स्वीकारत नसतील, तर ते कर्तव्यात कसूर करत आहेत, असे मानून त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी तक्रार केली गेली पाहिजे. शहरांमध्ये पालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याच्या बाबतीत पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत. त्याचा फटका शासनाला सर्व तऱ्हेचे कर भरणाऱ्या वाहनचालकांना बसत असतो. वाहने सुरक्षितरीत्या चालविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या वाहतूक विभागाने आणि पोलिसांनी रस्त्यावरच्या मोकाट गुरांची जबाबदारीही स्वीकारलीच पाहिजे. ही समस्या कशी सोडवायची हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. तो त्यांनी सोडविला नाही, तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हे आणि तक्रारी दाखल झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही. या तक्रारी दाखल करण्याचे काम सर्वसामान्य वाहनचालक नागरिकांनी करायला हवे. शासकीय कर्मचाऱ्यांना, प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याबाबत सर्वसामान्य नागरिक काहीही विचारत नाहीत. याचाच गैरफायदा एक प्रकारे प्रशासन घेत असते, याची जाणीवही सर्वसामान्यांनी ठेवायला हवी.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २९ सप्टेंबर २०२३)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply