डॉ. श्रीरंग कद्रेकर यांना यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांची यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

डॉ. कद्रेकर यांनी कोकण कृषी विद्यापीठामध्ये १९८७ ते १९९३ अशी सलग सहा वर्षे कुलगुरू म्हणून आपली कारकीर्द यशस्वी केली. या कारकिर्दीत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवडीसाठी कोकणातील शेतकऱ्यांना आंबा, काजू, कोकम, नारळ, चिकू, मसाला पिकांची लाखोंच्या पटीत दर्जेदार कलमे उपलब्ध करून दिली. परिणामी कोकणात फळझाड लागवड फलोत्पादन वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांना रोजगार मिळून त्यांचा आर्थिक विकास झाला. शिवाय पुढील काळात कोकणात फळप्रक्रिया उद्योगाचे नवे पर्व सुरू झाले. त्यांच्या अशा विविध क्षेत्रातील कार्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विभागीय तसेच जिल्हा स्तरावर असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

भारतीय पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेतर्फे आजही ते ९५ व्या वर्षीही पर्यावरण जागृतीचे उपक्रम राबवत असून संगमेश्वर तालुक्यातील सांदीपनी गुरुकुलचे गेली २३ वर्षे अध्यक्ष आहेत. तेथील गरीब, निराधार मुलांना शिक्षण आणि शेती उत्पादनातून रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे काम त्यांनी केले आहे.

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदाची धुरा त्यांनी दहा वर्षे सांभाळली. शासनाच्या आर्थिक साह्यातून ज्येष्ठ नागरिक संघाची स्वतःची वास्तू उभारण्यात यश मिळविले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय केंद्राचे ते बारा वर्षे उपाध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे विविध उपक्रम राबविले.

डॉ. कद्रेकर यांचे ”लाल मातीत रंगलो मी” हे आत्मकथन “कोकणच्या पाणी समस्या आणि उपाय” तसेच “आठवणी देश-विदेशातील भ्रमंतीच्या” या ललित लेखनाला वाचकांचा आणि अभ्यासकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल यशवंतराव चव्हाण सेंटरने घेऊन त्यांची यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कारासाठी निवड जाहीर केल्याने कोकणच्या वैभवामध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे.Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply