कणकवली : असलदे (ता. कणकवली) येथील द्विविजा वृद्धाश्रमात सिंधुरत्न फाउंडेशनने अन्नदान करून आपली परंपरा पाळली आहे.
सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्रच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकारी महिलांसह स्वस्तिक फाउंडेशन संचालित द्विविजा वृद्धाश्रमात जाऊन पितृपक्षानिमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली. अशा प्रकारची आर्थिक मदत दरवर्षी करण्यात येते.
यावेळी फाउंडेशनच्या श्रद्धा पाटील, शांता पाटील, मीलन पाटील, मयूरा भंडारे, मनीषा मिठबावकर, नंदिता ढेकणे, रविकिरण शिरवलकर, अनिल कांबळी, सिद्धेश कांबळी, अनुज कांबळी, हिंदरत्न डॉ. सुभाष भंडारे उपस्थित होते. यावेळी सुभाष भंडारे आणि अनिल कांबळी यांनी आर्थिक मदत केली.
आश्रमात एकूण ४५ आजी-आजोबा असून अक्षता कांबळी यांनी त्या सर्वांना मालवणी गजाली सांगून आणि सध्या सन मराठीवर “वेतोबा” मालिकेतील गावमामीचे प्रसिद्ध संवाद ऐकवून सर्वांना खूप हसवले. काही आजीआजोबांनी गाणी म्हटली. डॉ. भंडारे आणि सिद्धेश कांबळी यांनी गीते सादर करून आजी-आजोबांना आनंदित केले. दोन तास खेळीमेळीच्या वातावरणात गेले. यावेळी आश्रमाचे पदाधिकारी संदेश शेट्ये आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दात्यांचे आभार मानले.
अन्नदानाचे आवाहन
पारंपरिक पद्धतीने पितृपक्ष साजरा करण्यापेक्षा आपण एक दिवसाचे जेवण द्विविजा वृद्धाश्रमातील गरजू आजीआजोबांना देऊन एका नवीन कार्याला सुरुवात करू या. या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे आणि आजीआजोबांना आनंद द्यावा, असे आवाहन वृद्धाश्रमाकडून करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media



