जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी

रत्नागिरी :‘डॉक्टर्स येऊन तपासता का… औषधे उपलब्ध आहेत ना… ड्युटी जादा तर लावली जात नाही ना…’ असे प्रश्न रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर्स आणि परिचारिकांना जिल्हाधिकारी विचारत होते.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. शिवाय रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांच्याशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील एनआयसीयू, एनआरएचएम, प्रशासकीय विभाग, जिल्हा शल्यचिकित्सकांचे दालन, पीसीपीएनडीटी विधी समुपदेशक दालन, स्त्री रुग्ण विभाग, पुरुष रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, भौतिकोपचार, डीईआयसी, फिजिओथेरेपी विभागांची पाहणी करून माहिती घेतली. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधत उपचाराबाबत विचारपूस केली. त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक आणि सेवेवर उपस्थित असणाऱ्या
डॉक्टरांशीही संवाद साधला. पुरेशी औषध उपलब्ध आहेत का, अशी विचारणा करुन नसतील तर जी लागणार आहेत त्याबाबत खरेदीचा प्रस्ताव द्या, असे सांगून त्यांनी दाखल रुग्णांचीही माहिती घेतली. परिचारिकांशी संवाद साधून, एकीलाच ड्युटी लावली जाते का, वेळेपेक्षा जादा ड्युटी लावली जात नाही ना, अशी विचारपूस केली. काही अडचण असल्यास पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याबाबतही त्यांनी सांगितले. स्वच्छता
कर्मचाऱ्यांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत विशेषत: स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेविषयी त्यांनी विचारणा केली.

यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी मी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती. त्यावेळेपेक्षा आजच्या भेटीमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये खूप सुधारणा झाल्याचे मला आढळून आले. रुग्णालयामध्ये सर्वत्र साफसफाई दिसून आली. उपचारदेखील चांगले केले जात आहेत. त्याबाबत रुग्ण, नातेवाईक यांनीही समाधान व्यक्त केले. स्टाफ आणि रिक्त जागांबाबत शासन स्तरावर मागणी करून पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply