गांधी विचार मरणार नाहीत : अभिजित हेगशेट्ये

रत्नागिरी : महात्मा गांधीजींनी आपल्या प्रत्येक कृतीतून नैतिकतेचा संदेश दिला. त्यांची हत्या झाली असली तरी त्यांचे विचार कधीही मरणार नाहीत. त्यांचे विचार भारतापुरते मर्यादित राहिले नसून संपूर्ण विश्वाला गांधी विचाराने व्यापून टाकले आहे, असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी केले.

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. दीपाली तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. हेगशेट्ये यांनी गांधीजींच्या जीवनातील अनेक किस्से सांगितले. गांधीजींची गोलमेज परिषदेमधील भूमिका, दांडी यात्रा, चंपारण्य सत्याग्रह या संदर्भातील माहिती त्यांनी दिली. मिठाचा सत्याग्रह हा जगातील सर्वांत मोठा सत्याग्रह असून गांधीजींनी नैतिकतेच्या जोरावर इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते असे ते म्हणाले. देशात दंगल उसळली, त्यावेळी गांधीजींनी त्या ठिकाणी जाऊन शांतता प्रस्थापित केली. मात्र आज मणिपूर जळत असताना भारताचे नेतृत्व त्याकडे फिरकत नाही, हे मोठे दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गांधी जयंतीनिमित्ताने आयोजित केलेली स्वच्छता मोहीम महत्त्वाची आहे. प्रत्येकाने बाह्यरंगाची स्वच्छता बाळगताना अंतरंगाची स्वच्छता जोपासावी, असेही ते म्हणाले.

प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी गांधीजींची सर्वोदय ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या ५ प्रतिज्ञांचे महत्त्व त्यांनी विशद केले. प्रास्ताविक प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुशील साळवी यांनी केले, तर आभार प्रा. शुभांगी टी. आर. यांनी मानले.Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply