रत्नागिरी : रेड अँड सर्कल व ऑरा क्रिएशनचे संदीप म्हादये आणि शाहीर विकास लांबोरे यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक लग्नगीतांच्या अनोख्या स्पर्धेत सुवर्णा सुभाष पाथरे (बावनदी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
लोप पावत चाललेली दुर्मिळ पारंपरिक लग्नगीते पुन्हा लोकांना कळावीत यासाठी हा उपक्रम संदीप म्हादये आणि विकास लांबोरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. ‘जपण्यासारखं जपायला हवं, संपण्याआधी’ या टॅगलाइनखाली ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या या स्पर्धेत कोकणातून उत्तम प्रतिसाद लाभलाच, पण अमेरिकेहूनही काहींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये पुरुषांचा सहभाग लक्षणीय होता. स्पर्धेत सुनीता यशवंत कुरतडकर (कापडगाव) यांनी द्वितीय, तर सावित्री दत्ताराम कोलगे (चांदोर) आणि सुरेखा यशवंत नारकर (लांजा) यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला. आर्या भास्कर आगरे (कोतापूर) हिचे लक्षवेधी लग्नगीत म्हणून निवडण्यात आले. विजेत्यांना रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
कोकणचा साज संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचे प्रमुख कलाकार सुनील बेंडखळे आणि सचिन काळे यांनी या गीतांचे परीक्षण केले. लग्नगीतांप्रमाणे कोकणातील विविध लोककलांचेही जतन पारंपरिक पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून या लोककलांना उजाळा द्यावा, तसेच आधुनिकतेच्या नावाखाली यातील पारंपरिकता लोप पावणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे, असे मत बेंडखळे आणि काळे यांनी व्यक्त केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




