ऋचा पिळणकर, देवयानी केसरकर, मनोज मेस्त्री स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी

वालावल (ता. कुडाळ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटांमध्ये ऋचा संजय पिळणकर, देवयानी यशवंत केसरकर आणि मनोज भालचंद्र मेस्त्री या तिघांनी स्वरसिंधुरत्न पुरस्कार पटकावला आहे.

प्रथम गटातील प्रथम क्रमांक विजेती ऋचा संजय पिळणकर हिला सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कै. प्रभू यांनी स्वरसिंधुरत्न स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेची आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित स्पर्धेत १९ ते १६ वर्षे वयाच्या शालेय गटात ऋचा संजय पिळणकर, १७ ते ३५ वर्षे वयाच्या युवा गटात देवयानी यशवंत केसरकर आणि ३५ वर्षांवरील खुल्या गटात मनोज भालचंद्र मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावले. पहिल्या गटात भाविक गजानन मेस्त्री आणि श्रुती शरद सावंत यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. दुसऱ्या गटात विधिता वैभव केंकरे आणि हर्षल सगुण मेस्त्री यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. प्रदीप धोंड (मुंबई) आणि सौ. मुग्धा देसाई (कोल्हापूर) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेत तिन्ही गटांमध्ये मिळून २७ स्पर्धक सहभागी झाले.
तिन्ही गटांतील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूल आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे वितरण आषाढी एकादशीला (रविवार, दि. १० जुलै २०२२) श्री क्षेत्र वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. विजेत्यांना तेथील नियोजित कार्यक्रमात आपली कला सादर करण्याची संधी दिली जाईल. सादरीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शन केले येईल, असे आयोजक प्रशांत धोंड, डॉ. प्रणव प्रभू, अक्षय प्रभू यांनी जाहीर केले.

स्पर्धेनंतर परीक्षक आजची (दि. १३ मे) स्पर्धा संपल्यानंतर श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या सभामंडपात स्पर्धेचे परीक्षक प्रदीप धोंड आणि सौ. मुग्धा देसाई यांची शास्त्रीय गायनाच्या विशेष संगीत मैफल झाली. तिला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

दुसऱ्या गटातील दुसरा क्रमांक मिळविणारे विधिता वैभव केंकरे आपल्या आईवडिलांसोबत सहभाग प्रमाणपत्र स्वीकारताना

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply