रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी आणि पदाधिकारी निवडण्यासाठी रविवारी (दि. १५ मे) निवडणूक होणार आहे. संस्थेचे सुमारे एक हजार मतदार पुढच्या पाच वर्षांचे संस्थेचे पदाधिकारी ठरविणार आहेत.
सोसायटीच्या एकूण ३७ पदांसाठी ६६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अरुअप्पा जोशी पॅनेल विरुद्ध संस्था पॅनेल अशी ही निवडणूक आहे.
अध्यक्ष, कार्यवाह आणि सहकार्यवाहपदाच्या प्रत्येकी एका पदासाठी प्रत्येकी २, उपाध्यक्षपदाच्या ३ जागांसाठी ५, विश्वस्तपदाच्या ३ जागांसाठी ६, सल्लागार मंडळाच्या १० जागांसाठी १४, नियामक मंडळाच्या १८ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
संस्थेच्या कॉमर्स बिल्डिंगमध्ये सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. एकूण १,०७३ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. १६ मे) होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. मकरंद साखळकर काम पाहणार आहेत.