चिपळूण : एकत्र कुटुंबे विभक्त झाली, ती विभक्तता शेतीत आली. पण नव्या युगाची आधुनिकता शेतीत का अवतरली नाही, हा प्रश्न घेऊन येथील दिशान्तर संस्थेतर्फे आयोजित एकात्मिक शेती कार्यशाळा पार पडली. त्यामध्ये संगमेश्वर, चिपळूण, खेडमधील महिला शेतकर्यांनी सहभाग घेतला.
शेतीमध्ये आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा हवा. ज्याच्याकडे भूक आहे आणि अन्नदेखील, अंथरुणासह शांत झोप आहे तो भाग्यवान. शेतकर्यांकडे हे सारे आहे.. म्हणून तो बळीराजा ठरला आहे, असा गौरवपूर्ण सूर या कार्यशाळेत निघाला. दापोलीतील बाळासाहेब सावेत कोकण कृषी विद्यापीठ तसेच विद्यापीठाचे मुळदे येथील प्रक्षेत्र तसेच दशक्रोशीतील एकात्मिक आणि आधुनिक शेतीतील अनुभव तसेच प्रगतशील शेतकरी आणि कृषी संशोधकांशी संवाद साधण्यात आला. सेंद्रिय खत निर्मिती, कलम बांधणी, गोड्या आणि निमखार्या पाण्यातील मत्स्य शेती, एकात्मिक शेती अशा सार्या संदर्भाने मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रम या कार्यशाळेत घेण्यात आले. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपल्या मार्गदर्शनातून शेती आणि मानवी जीवनाचे सूत्र सुसंगतवार मांडले. प्रतिक्रिया नको प्रतिसाद द्या. वेदना आणि संवेदना, सुखी नव्हे समृद्धी हवी , यासाठी जीवनात स्केल नि स्किल हवे. तसेच कृतीही विघातक नव्हे, तर विधायक हवी, असे प्रबोधन झाले.
ज्याच्याकडे जे आहे ते देण्याची दानत हवी. उच्च शिक्षणाने समाज सुदृढ व्हायला हवा होता. मात्र, उलट त्याचे परिणाम लिव्ह इन रिलेशनशिपमधून दिसावेत, हे गंभीर आहे. यासाठी विचारशक्तीला चालना देणारे शिक्षण हवे. कितीही शिका, कर्म करावेच लागेल, अशा वास्तवाची जाणीव यानिमित्ताने नव्या पिढीला करून द्यावी लागेल, अशा जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. शेतीत पद नि प्रतिष्ठा आहे. फॉर्चुनरवाल्या गाडीवाल्याकडे जसे पाहिले जाते, तसे डौलाने जाणार्या बैलगाडीवाल्या शेतकर्याकडे अभिमान नि कौतुकाने पाहिले गेले पाहिजे. महिलांकडे उपजत व्यवस्थापन कौशल्य असते. मुलांमधील आणि स्वतःमधील बलस्थाने त्यांनी ओळखायला हवीत. समाजात आज विरोधाभासी चित्र प्रकर्षाने दिसते. पन्नास किलो धान्याचे पोते विकत घेण्याची ताकद आहे, त्याच्याकडे ते पोते उचलण्याची क्षमता नाही. दुसरीकडे ज्याच्या खिशात पन्नास रुपये आहेत तो ते पन्नास किलो वजनाचे पोते उचलू शकतो. मग सुदृढ कोण, असा प्रश्न उभा ठाकतो.
यशाची व्याख्या प्रकृतीवर अवलंबून असते. भोवतालची परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य असायला हवे. यशस्वी उद्योजक बनेन, हे ध्येय उराशी बाळगा नि त्या उद्योगात किमान वीस व्यक्तींना रोजगार मिळवून देईन, असा व विश्वास असायला हवा, तरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळाला, असे म्हणता येईल, असे मार्गदर्शन कृषी तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी, संशोधक यांनी केले.
मार्गदर्शकांमध्ये कोकण कृषी विद्या्पीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. सी. हळदवणेकर, सिंधुदुर्ग नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक अजय थुटे, भगीरथ प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, कृषी तंत्रज्ञान आणि माहिती केंद्राचे डॉ. संतोष वरवडेकर, मुळदे मत्स्य महाविद्यालयाचे नितीन सावेत, शेतीपूरक व्यवसाय संदर्भाने पशुवैद्यकशास्त्र डॉ. अमोल मेस्त्री, कृषी पर्यवेक्षक अमोल करंदीकर, एकात्मिक शेतीचे अर्थकारण-प्रगतशील शेतकरी बाजीराव झेंडे, निसर्गानुकूल शाश्वत पर्यावरणीय शेतीसंदर्भात विनायक तथा काका महाजन, डॉ. मंदार खानविलकर, डॉ. नेहा दळवी, डेअरी व्यवस्थापन डॉ. प्रसादे अशा तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी दिशान्तर संस्थेचे राजेश जोष्टे, सीमा यादव उपस्थित होत्या. दोन टप्प्यांत पाच दिवशीय प्रशिक्षण आणि अभ्यास सहल झाली. माहिती पुस्तिका, प्रमाणपत्र देऊन महिला शेतकर्यांना गौरविण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड