सायकल फेरी काढून दापोलीत परिचारिकांविषयी कृतज्ञता

दापोली : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण करून, त्यांच्याविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथे सायकल फेरी काढून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला.

दापोलीतील सायकल फेरी

परिचारिका रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची अहोरात्र सेवा करत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करत असतात. करोनासारख्या संकटकाळात तर परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत असाधारण कार्य करणाऱ्या परिचारिकांचे कौतुक आणि आभार मानण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे परिचारिका दिनी सायकल फेरी काढण्यात आली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.

ही सायकल फेरी दापोलीच्या आझाद मैदानातून सुरू झाली आणि नॅशनल हायस्कूल, काळकाई कोंड आमराई, नशेमन कॉलनी, आझाद नगर, खोंडा, फिश मार्केट, उपजिल्हा रुग्णालय मार्गे ६ किलोमीटर अंतर पार करून पुन्हा आझाद मैदानात दाखल झाली. उपजिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे आभार मानण्यात आले.

वैद्यकीय क्षेत्रातील परिचारिकांचे योगदान आणि सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय आरोग्य सेवा अपूर्ण आहेत. या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ महेश भागवत, इनचार्ज सिस्टर निर्मला जाधव, अनघा घाग, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर जाधव, अधिपरिचारिका साक्षी हांडे, प्रिया वंडकर, गायत्री भाटकर, स्नेहल गोकणे, जोगेश्वरी वळवी, निकिता घुगरे, अर्चना वसावे, स्वप्नाली दाभोळकर, मालिनी वसावे, दीपिका नांदगावकर आणि सहकारी उपस्थित होते. त्यांनी निरोगी आरोग्यासाठी शरीराची, अवयवांची स्वच्छता, काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले. सायकल फेरी झाल्यावर काही सायकलस्वारांनी उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या शिबिरात रक्तदानही केले.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्य सायकल फेरीचे आयोजन केले जाते. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, पराग केळसकर, सूरज शेठ, प्रशांत पालवणकर, झाहीद दादरकर, अमोद बुटाला इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करावा आणि इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply