अशोक प्रभू प्रथम स्मृती हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेला प्रारंभ

वालावल (ता. कुडाळ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेला आज (दि. १३ मे) सकाळी येथे प्रारंभ झाला. येथील लक्ष्मीनारायण मंदिरात ही स्पर्धा सुरू झाली.

कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कै. प्रभू यांनी स्वरसिंधुरत्न स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेची आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन देवस्थानचे विश्वस्त लक्ष्मण देसाई, परीक्षक प्रदीप धोंड (मुंबई), सौ. मुग्धा देसाई (कोल्हापूर), प्रसिद्ध तबलावादक महेश देसाई, आयोजक प्रशांत धोंड, प्रसाद मेस्त्री, अरुण केळुस्कर, संदीप पेंडुरकर, निवेदक नीलेश गुरव, कलादिग्दर्शक सुमित पाटील, डॉ. प्रणव प्रभू, अक्षय प्रभू उपस्थित होते.

स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतीच मर्यादित असून १९ ते १६ वर्षे पूर्ण (शालेय गट), १७ ते ३५ वर्षे पूर्ण (युवा गट) आणि ३५ वर्षांवरील गट (खुला गट) अशा तीन गटांमध्ये स्पर्धा होत आहे. पहिल्या गटातील पवन उमेश प्रभू याच्या गायनाने स्पर्धेला प्रारंभ झाला. स्वरसिंधुरत्न २०१९ स्पर्धेतील शालेय गटातील प्रथम क्रमांक पवन प्रभू याने पटकावला होता. (त्याच्या आजच्या स्पर्धेतील गायनाची झलक सोबतच्या व्हिडीओवर)

तिन्ही गटांतील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येईल. स्वरसिंधुरत्न पुरस्कार रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र या स्वरूपात असेल. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल. स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे वितरण आषाढी एकादशीला (रविवार, दि. १० जुलै २०२२) रोजी श्री क्षेत्र वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. विजेत्यांना तेथील नियोजित कार्यक्रमात आपली कला सादर करण्याची संधी दिली जाईल. सादरीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शन केले येईल.

परीक्षकांचे विशेष सादरीकरण

आजची (दि. १३ मे) स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी ७ वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या सभामंडपात स्पर्धेचे परीक्षक प्रदीप धोंड (मुंबई), सौ. मुग्धा देसाई (कोल्हापूर) यांची शास्त्रीय गायनाची विशेष संगीत मैफल होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply