Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

संकल्प कलामंचातर्फे यमुनाबाई खेर ट्रस्टला संस्थागौरव पुरस्कार

Advertisements

रत्नागिरी : अलीकडेच अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टला संकल्प कलामंचातर्फे संस्थागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खेर ट्रस्ट संचालित सर्वोदय छात्रालयात हजारो विद्यार्थी खेड्यापाड्यांतून येऊन राहिले. सुशिक्षित झाले. स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि उच्च पदावरही कार्यरत आहेत. संस्थेच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल संकल्प कलामंचने ट्रस्टला सन्मानित केले. मारुती मंदिर येथील महिला मंडळ सभागृहात हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पार पडला.

संकल्प कलामंच, भारतीय नाविक सेना युनियन, मुंबई आणि टी.डब्ल्यू.जे. कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. रत्नागिरीमध्ये सामाजिक क्षेत्रात वावरत असताना सामाजिक जाणीव ठेवून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, याचे भान ठेवून विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक संस्था आणि व्यक्तिमत्त्वे असतात. त्यांचा शोध घेऊन दरवर्षी त्यांना गौरविण्यात येते. त्यामध्ये सामाजिक संस्था, साहित्यिक, डॉक्टर, लेखक, कवी, पत्रकार, उद्योजक, कलाकार, खेळाडू, कीर्तनकार इत्यादी अनेकांचा समावेश आहे.

यावर्षीच्या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक वामन जोग, सह्याद्री वृत्तवाहिनी निवेदिका सौ. भक्ती सावंत, संकल्प कलामंचचे अध्यक्ष विनोद वायंगणकर, सल्लागार डॉ. दिलीप पाखरे, यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ उपस्थित होते. खेर ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग पेठे, संचालक बाळकृष्ण शेलार, माजी विद्यार्थी रघुवीर शेलार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सर्वोदय छात्रालयाचा गौरव करताना डॉ. दिलीप पाखरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी अभिमानास्पद प्रशंसा केली. त्यांनी स्वतः १००१ रुपये भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version