रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरीत स्थापन होऊन आज ३ वर्षे पूर्ण होत असून हे केंद्र चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे.
आगामी काळात उपकेंद्राच्या उपक्रमांचा आणि अभ्यासक्रमांचा रत्नागिरीकरांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.
श्री. मराठे म्हणाले, हे उपकेंद्र २ ऑगस्ट २०२१ पासून रत्नागिरी आणि कोकणवासीयांसाठी स्थापन झाले. तिथपासून सातत्याने रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे विविध उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. कोणत्याही भाषेला जिवंतपणा आवश्यक असतो. त्यासाठी निरंतर चळवळ आवश्यक असते. याचीच प्रेरणा घेऊन नागपुरातील रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र प्रथमच कोकण भागात स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आणि उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सततच्या सहकार्यामुळे हे उपकेंद्र उभे झाले. गेल्या ३ वर्षांच्या काळात या उपकेंद्रात योगशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, संस्कृत, नाट्यशास्त्र यासारख्या विविध विषयांचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे शोधरत्नम, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत स्मृती प्रबंध, जागदीशी, न्यायेन्दुशेखर, गादाधरी यासारखी महत्त्वाची नवन्यायाशी संबंधित हस्तलिखिते अशी अत्यंत महत्त्वाची प्रकाशने झाली. शिवाय लघुजातकम् आणि बृहद्वास्तुमाला यांचा शास्त्रीय पद्धतीचा मॅपिंग प्रकल्प अचूकपणे पूर्ण करण्यात आला. न्यायदर्शनविषयक हस्तलिखित संपादन व प्रकाशन परियोजनेअंतर्गत एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आला.
आज या उपकेंद्रात CDOE म्हणजेच दूरस्थ पद्धतीने १०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय नियमित अभ्यासक्रमाला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद आहे. या ३ वर्षांत रत्नागिरी उपकेंद्राला प्रशासन आणि रत्नागिरीकर यांच्याकडून मोलाचे सहकार्य मिळाले, असे सांगून डॉ. मराठे म्हणाले, उपकेंद्राचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद. या परिषदेला भारतासह विविध देशांतून मान्यवर आणि अभ्यासक मंडळी आली होती. भारतीय परंपरेतील योगशास्त्राला प्रोत्साहन देण्यासाठी समग्र स्वास्थ्यासाठी योग यावर आधारित कार्यशाळेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. आगामी काळात संस्कृत आणि संस्कृतेतर विषयांसाठी जोमाने काम करण्याचा उपकेंद्राचा मानस आहे, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी उपकेंद्राला आज ३ वर्षे होत आहेत. याचा मनस्वी आनंद आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी उपकेंद्राला वेळोवेळी मार्गदर्शन केले. शिवाय त्यांच्याच प्रयत्नामुळे उपकेंद्राला विविध अनुदाने प्राप्त झाली. नुकतेच उपकेंद्राला भारतीय ज्ञान परंपरा आणि धर्मशास्त्र विषयक प्रकल्प प्राप्त झाले आहेत. या उपकेंद्राच्या प्रवासात पदोपदी स्थानिक जाणकार मंडळी, रत्नागिरीकर, स्थानिक महाविद्यालये यांनी मोलाचे सहकार्य केले. शिवाय स्थापनेच्या वेळी तत्कालीन कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, माजी कुलगुरू प्रा. मधुसूदन पेन्ना आणि विद्यमान कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी या तिन्ही विभूतींचे नेहमी उपकेंद्राला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यापुढेही सातत्याने असेच नवनवे उपक्रम सुरू राहणार आहेत, अशी पुस्ती डॉ. मराठे यांनी जोडली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड







