कविकुलगुरू कालिदास म्हणजे साहित्य क्षेत्राचे मेरूमणी – डॉ. दिनकर मराठे

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास साहित्य क्षेत्राचे मेरूमणी आहेत, असे गौरवोद्गार भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी काढले.

ते रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात महाकवी कालिदास दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, संस्कृत भाषा व संस्कृत साहित्याची व्याप्ती मोठी आहे. मात्र संस्कृत क्षेत्रातील अग्रणी साहित्यिक व महाकवी कालिदास यांनी स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर वाचकांच्या मनावर मोहिनी घातली. त्यामुळेच आजच्या आधुनिक काळातदेखील महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा संस्कृतप्रेमी आणि साहित्याचे वाचक आस्वाद घेत आहेत.

डॉ. मराठे म्हणाले, आजचा दिवस खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. संस्कृत कवींमध्ये महाकवी कालिदास सर्वश्रेष्ठ आहेत आणि विश्वविद्यालयाचे नावदेखील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे विश्वविद्यालय नागपूरमधील रामगिरी पर्वताच्या पायथ्याला असणाऱ्या रामटेक परिसरात आहे. याच रामगिरी पर्वतावर महाकवी कालिदास यांनी मेघदूत हे अजरामर खंडकाव्य रचले.

महाकवी कालिदास यांच्या लेखनप्रतिभेबाबत आणि विद्वत्तेबाबत बोलताना डॉ. मराठे म्हणाले की, पुरा कविनां गणना प्रसंगे.. या संस्कृत भाषेतील प्रसिद्ध उक्तीनुसार कोणे एके काळात संस्कृत कवींमध्ये श्रेष्ठ कोण असा प्रश्न विद्वानांनी उपस्थित केला होता, तेव्हा हाताच्या बोटांवरून गणना सुरू झाली. यावेळी कनिष्ठिका बोटावर कालिदास यांचे नाव गणले गेले मात्र अनामिकेपर्यंतही कालिदासापेक्षा उत्तम कोणताच कवी सापडला नाही. अनामिकेचा नावरहित असा अर्थ यानिमित्ताने सार्थ झाला. महाकवी कालिदास हे उपमा अलंकारासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या मालविकाग्निमित्र, अभिज्ञानशाकुन्तलम् आणि विक्रमोर्वशीयम् ही तीन नाटके रघुवंश, कुमारसंभव ही दोन महाकाव्ये आणि मेघदूत खंडकाव्य तसेच ऋतुसंहार हे निसर्गवर्णनपर काव्य या ७ साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. आजही या ७ साहित्यकृतींवर सतत अभ्यास व संशोधन सुरू आहे .

या कार्यक्रमात महाकवी कालिदास यांच्या अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मेघदूत या साहित्यकृतींमधील निवडक महत्त्वाच्या श्लोकांचे सामूहिक पठण करण्यात आले. श्लोकांमधील लेखनवैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली. शिवाय एक लघुपट दाखवण्यात आला.

कार्यक्रमाला रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply