रत्नागिरीत कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद

रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती या विषयावरील ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे. यामध्ये भारतासह परदेशातील तज्ज्ञसुद्धा सहभागी होणार आहेत.

येत्या १७ आणि १८ ऑगस्टला ही परिषद येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे. सिद्धांत नॉलेज फाउंडेशन, संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान (मुंबई) आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सहयोगाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

कालिदास विश्वविद्यालय या महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विश्वविद्यालयाच्या माध्यमातून संस्कृत आणि संस्कृतीचा प्रचार सर्वत्र व्हावा, यासाठी चार उपकेंद्रे महाराष्ट्रात विविध ठिकाणी स्थापन करण्यात येत आहेत. त्यापैकी पहिले उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन करण्यात आले आहे. रत्नागिरी उपकेंद्राचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र असे नामकरण करण्यात आले आहे. महामहोपाध्याय पां. वा. काणे हे भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्राप्त करणारे पहिले संस्कृत विद्वान ठरले. डॉ. काणे हे एक विद्वान विधिज्ञदेखील होते. धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याचे काणे यांचे काम विश्वविख्यात आहे. ती सर्व भारतीयांसाठी अतिशय गौरवाची गोष्टदेखील आहे.

त्यांच्या नावाने सुरू झालेल्या विद्यापीठ उपकेंद्राने आयोजित केलेल्या परिषदेसाठी पाच विश्वाविद्यालयांचे कुलगुरू उपस्थित राहणार आहेत. गोव्याचे लोकायुक्त आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी, सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. मरियानो इटर्ब, इटलीतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पावलो बरोन, श्री श्री युनिव्हर्सिटीचे कुलपती बी. आर. शर्मा, ओडिसातील जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचे कुलपती एस. रामरत्नम, एसएसएएसपीच्या (मुंबई) नियामक मंडळ सदस्य डॉ. रंजना नायगावकर, सोमय्या भारतीय संस्कृती पीठाच्या प्राचार्य, सहाय्यक संचालिका डॉ. ललिता नामजोशी, कालिदास विश्वविद्यालयाचे कुलपती प्रो. मधुसूदन पेन्ना, नवी दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलपती प्रा. श्रीनिवास वरखेडी, भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास असलेले काही परदेशी विद्वान, भारतातील ज्येष्ठ प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.

परिषदेसाठी आतापर्यंत १५० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, शोधछात्र आणि नागरिकांनी नावनोंदणी केली आहे. एकूणच परिषदेसाठी संपूर्ण भारतातून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. रत्नागिरीतील नागरिकांनाही या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी त्यासाठी नावनोंदणी करावी. त्यासाठी ९०२८४९४१९९ किंवा ८६००५२६८८२ या क्रमांकावर संपर्क साधावा. रत्नागिरीकरांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार असलेले मान्यवर


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply