हल्ली मिसळ या खाद्यप्रकाराबद्दल खूप लिहिलं, बोललं जातं आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात मिसळ खाल्लीही जाते. मिसळ हा पोटभरीचा खाण्याचा प्रकार म्हणून मान्यता पावला आहे. त्यामुळे समाजातल्या सर्वच घटकांना तो आपलासा वाटतो.

मिसळ खाण्याची अशी अनेक ठिकाणं सध्या विकसित झाली आहेत आणि ते सर्वच जण आपापल्या परीने उत्तम करण्याचा प्रयत्न करत असतात. पण मंडळी, आज मी अशा एका व्यक्तीबद्दल, खरं तर तरुण व्यक्तीबद्दल सांगतोय, ज्याने त्याच्या मिसळीला संस्कारांचा अभिषेक केला आहे. ‘ अन्न हे पूर्णब्रह्म ‘ हे आचरणात आणलं की त्या पदार्थाची चव त्यातल्या संस्कारांच्या भावनेने वाढते. प्रेमाने केलेला पदार्थ हा त्यातील उत्तम आणि निर्मळ भावनेमुळे अधिक लज्जतदार होतो, हा अनुभव आहे, भारतीय संस्कृतीच्या संस्कारांचं हे वाण घेऊन जेव्हा एक तरुण समर्थपणे, अभिमानाने आणि प्रसंगी व्यवसायाच्या भौतिक परिणामांची पर्वा थोडीशी बाजूला करूनसुद्धा , पुढे निघतो, तेव्हा त्याची दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं.

एवढी मोठी प्रस्तावना झाल्यावर मित्रांनो, मी आज ज्या व्यक्तीबद्दल लिहितोय त्या व्यक्तीचं नाव आहे, हृषिकेश उदय शितूत. निवळी-गणपतीपुळे रस्त्यावर ‘तरवळ’ या छोट्याशा गावात झणझणीत शितूत मिसळ अशी पाटी दिसते आणि मग सुरू होतो झणझणीत मिसळ देणाऱ्या पण स्वतः मात्र तसा झणझणीत नसणाऱ्या हृषिकेश या तरुणाच्या उद्यमशीलतेचा अनुभव घेण्याचा सोहळा….
या हॉटेलात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर लावलेल्या पाट्या लक्ष वेधून घेतात. खरं तर त्याला हॉटेल कसं म्हणायचं असा मला प्रश्न पडला. कारण त्या वास्तूत प्रवेश करताना चपला बाहेर काढाव्या लागतात. इथून खरं तर संस्कारांच्या आग्रहाची सुरुवात होते. एकदा अन्न हे पूर्णब्रह्म हे मान्य केलं की त्या पूर्णब्रह्माकडे जाताना भौतिकतेबरोबरच मानसिक तामसी भावना, आचार, विचार हे त्या चपलांसोबतच बाहेर ठेवून आत या, हे सांगण्याचा हा प्रयत्न! असं केल्यावर ते अन्न आपोआपच चविष्ट तर लागेलच, पण त्याचबरोबर शरीरावर त्याचे दुष्परिणामही होणार नाहीत, असंच आपली संस्कृतीसुद्धा सुचवत नाही का? इथे असणारी सेल्फ सर्व्हिस हीसुद्धा एका वेगळ्या मानसिकतेने केली गेली असावी, असं वाटून गेलं. सामान्यतः व्यवसायातल्या कर्मचारीवर्गाच्या उपलब्धतेवर आधारित ‘सेल्फ सर्व्हिस’ हा प्रकार रूढ झाला, पण इथे तशी गरज दिसत नसतानासुद्धा ती तशी आहे, यामागेसुद्धा हृषीकेशच्या संस्कारप्रसारणाची वेगळी संकल्पना असावी, असं वाटून गेलं. प्रेमाने आणि आत्मीयतेने स्वतः घेतलेला पदार्थ अधिक रुचकर होतो, तो घेण्याची आपली इच्छा आपल्या शरीरासाठी त्याचा योग्य उपयोग होण्यामध्ये परावर्तित होते आणि त्याचं फळ चांगलंच मिळतं.
चपला काढण्याच्या ठिकाणीच एक काउंटर आपलं लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे मोफत परफ्यूम काउंटर. मनुष्यस्वभावानुसार आपण तिकडे लगेच आकर्षित होतो आणि सुगंधित वातावरणातच आत प्रवेश करतो. त्यामुळे प्रत्यक्ष खाण्याचा आस्वाद घेताना वातावरण सुगंधी राहायला मदत होते आणि वातावरणातला हा सुगंध जिभेवर तरळत पोटात गेला की स्वांतः सुखाय अवस्था निर्माण झाली नाही तरच नवल!

व्यवसाय करतानासुद्धा सामाजिक भान जपता येतं, याचा प्रत्ययसुद्धा हा तरुण देतो. लहान बाळांसाठी दूध किंवा गरम पाणी हवं असेल, तर ते मोफत देऊ, असं सांगून त्या सामजिक जाणिवेबरोबरच संस्कारांचं बीज किती खोलवर रुजलं आहे, याची साक्ष देतो. इतकंच नाही, तर लहान बाळांसाठी आपण सोबत आणलेला मऊ भात, खीर किंवा पेज असे पदार्थ गरम करून देऊ आणि तेही कोणतेही मूल्य न घेता, अशी हमी देताना त्याच्यातील संवेदनशीलतेचं दर्शन घडतं.
एवढी संवेदनशीलता आणि सामजिक जाणीव जेव्हा बाळगतो, तेव्हा सन्मार्गाने प्राप्त झालेल्या नैतिक अधिकारामुळे “या ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्या लोकांना ‘शितूत झणझणीत मिसळ’ न देता गूळ-खोबरे दिले जाईल” अस सांगण्याचं धाडस हृषिकेश दाखवतो. यातून त्याचा निर्मळपणा जसा अधोरेखित होतो, तसाच संस्कारांचा आग्रह फक्त सांगण्यापुरता किंवा दाखवण्यापुरता नाहीस हे आपोआप उमजून येतं.
या अवलियाबद्दल जेव्हा लिहावंसं वाटलं, तेव्हा ‘मिसळ’ या एकाच गोष्टीशी न घुटमळता काही वेगळा विचार मांडावा म्हणून हा प्रयत्न केला. मित्रांनो, आपण मिसळ अनेक ठिकाणी अनेक प्रकारची खाल्ली असेल, पण या लेखासोबतच्या चित्रातल्या मिसळीच्या मागे दडलेल्या “हृषिकेश उदय शितूत” या अवलियाच्या अंतरंगात डोकावण्यासाठी तुम्हाला ‘तरवळ’लाच जावं लागेल.
- निबंध कानिटकर, संगमेश्वर
(संपर्क – ९४२२३७६३२७)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड