मुंबई विद्यापीठ ठाणे उपकेंद्रात विज्ञानविषयक राष्ट्रीय ऑनलाइन परिषद

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने भारतीय विज्ञानाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या विषयांवरील राष्ट्रीय परिषद मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात पार पडली.

मुंबई विद्यापीठचे ठाणे उपकेंद्र, कल्याण केंद्र आणि रत्नागिरी उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने कोची येथील विज्ञान भारतीच्या सहयोगाने ही परिषद झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. त्यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक, ठाणे उपकेंद्राचे प्रभारी संचालक अद्वैत वैद्य, रत्नागिरी उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.

विज्ञानातून स्वातंत्र्यासाठी संघर्ष असे परिसंवादाचे शीर्षक होते. भारताचा स्वातंत्र्यलढा राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक अशा अनेक आघाड्यांवर चालला होता. ७५ वर्षांपूर्वी भारताला परकीय राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुन्हा स्वातंत्र्य मिळवण्याचा संघर्ष आजही सुरू आहे. या सगळ्याची माहिती व्हावी, यासाठी या परिसंवादाचे आयोजन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्चच्या संचालक प्रा. रंजना अग्रवाल यांनी ब्रिटिश राज आणि भारतावरील वैज्ञानिक वर्णभेद या विषयावर मार्गदर्शन केले. पंजाब विद्यापीठाच्या मानव संसाधन विकास केंद्राचे उपसंचालक प्रा. जयंती दत्ता यांनी वैज्ञानिक राष्ट्रवादाचा उदय, विज्ञान भारतीचे सचिव विवेकानंद पै यांनी भारताच्या वैज्ञानिक-आर्थिक राष्ट्रवादाचा इतिहास, वाराणसीच्या हिंदू विद्यापीठातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या रसायनशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक व्ही. रामनाथन यांनी स्वावलंबनाची सुवासिक कथा : चंदनाचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन केले.

आज दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्यापूर्वीची आयुर्वेदाची स्थिती (प्रा. डॉ. माधुरी वाघ, प्रमुख, द्रव्यगुण विभाग, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर), मुत्सद्दी शास्त्रज्ञ: 1947 पूर्वी भारताच्या जागतिक बॅटनचे वाहक (डॉ. चैतन्य गिरी, स्पेस डोमेन सल्लागार, विकसनशील देशांसाठी संशोधन आणि माहिती प्रणाली, नवी दिल्ली), भारताचे क्रांतिकारक : वैज्ञानिक आणि स्वातंत्र्यसैनिक (प्रा. राजीव सिंग, सहाय्यक प्राध्यापक, अजैविक रसायनशास्त्र, दिल्ली विद्यापीठ) आणि आत्मनिर्भर भारताकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान नवकल्पना (डॉ. दिलीप पेशवे, हॅग प्रोफेसर, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर) या विषयांवर मार्गदर्शन झाले. प्लासीची लढाई, १७५७ आणि भारताचे वैज्ञानिक शोषण (जयंत सहस्रबुद्धे, राष्ट्रीय संघटन सचिव, विज्ञान भारती, नवी दिल्ली) यांनी समारोपाचे मार्गदर्शन केले. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी परिषदेचा समारोप केला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply