रत्नागिरी : येथील दैवज्ञ हितवर्धक नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या सभासदांसाठी दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे.
पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दैवज्ञ भवनात अध्यक्ष विजय पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दहा टक्के लाभांश जाहीर केला. संस्थेची उत्तरोत्तर होणारी प्रगती आणि त्यामध्ये संस्थेच्या सभासदांचे योगदान विचारात घेऊन शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त लाभांश देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे, असेही ते पुढे म्हणाले.
सरत्या आर्थिक वर्षात संस्थेने वीस लाख रुपयांपेक्षा अधिक निव्वळ नफा मिळवला आहे. ही निश्चितच अभिमानास्पद कामगिरी आहे. संस्थेने गेल्या काही वर्षांमध्ये निरनिराळ्या पद्धतीने आणि सभासदांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा करण्यासाठी कमीत कमी व्याजदर हे तत्त्व अवलंबले आहे. नफ्याचे प्रमाण सातत्याने वाढते ठेवण्यामध्ये संस्था यशस्वी झाली आहे. गेली २१ वर्षे संस्था सातत्याने अ वर्गात काम करत आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये अ वर्गात काम करणाऱ्या काही मोजक्याच आर्थिक संस्था असून त्यामध्ये दैवज्ञ पतसंस्थेचे नाव अग्रणी आहे, असेही ते पुढे म्हणाले.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संस्थेच्या सभासदांपैकी दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेतर्फे करण्यात आले. सीएची परीक्षा पहिल्या प्रयत्नांत उत्तीर्ण होणाऱ्या कशेळी येथील सृष्टी कशेळकर हिचा गौरव करण्यात आला. सृष्टी ग्रामीण भागामधून शालेय आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पहिल्याच प्रयत्नामध्ये सनदी लेखापाल म्हणजेच सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे कौतुक करण्यात आले. वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी हजर राहून चर्चेमध्ये सहभाग घेतला. संस्थेच्या उत्कर्षासाठी अनेक उपाययोजना सुचवून संस्थेला भविष्यात विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक अनिल उपळेकर, राजन कारेकर, आनंद वीरकर, दीपक खेडेकर, महेश खेडेकर, सचिव सौ. रत्ना आचरेकर, किशोर कारेकर आणि ज्येष्ठ संचालिका सौ. अंजली पेडणेकर यांनीही मार्गदर्शन केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड







