खारवी समाज पतसंस्थेला नव्या ५ शाखांसाठी मंजुरी

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला रत्नागिरी जिल्ह्यात नव्या ५ शाखा सुरू करायला सहकार खात्याची मंजुरी मिळाली आहे.

पतसंस्थेची सध्या रत्नागिरी येथे एकच शाखा आहे. आता रत्नागिरी तालुक्यात खंडाळा आणि पूर्णगड, गुहागर तालुक्यात शृंगारतळी आणि पालशेत तर दापोली तालुक्यात दाभोळ येथे शाखा सुरू करायला परवानगी मिळाली आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, सहकार क्षेत्रातील जुजबी माहिती असताना २० नोव्हेंबर २०१८ रोजी स्थापन झालेल्या खारवी पतसंस्थेचे प्रधान कार्यालय २७ जानेवारी २०१९ रोजी सुरू झाले. सभासदांची विश्वासार्हता वाढवून ग्राहकांचा आर्थिक विकास साधत प्रगतिपथावर मार्गक्रमण करणारी पतसंस्था म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आली. पहिल्या दिवसापासूनच शंभर प्रतिशत संगणकीय प्रणालीद्वारे काम करत पहिल्या दिवसापासूनच एसएमएस सुविधेचा प्रारंभ केला. संस्थेत १०० टक्के सायबर सिक्युरिटी सुविधा आहे. सलग ४ वर्षे लेखापरीक्षणाचा ‘अ’ वर्ग मिळाला आहे. सलग ४ वर्षे संस्था चढत्या क्रमाने नफ्यात आहे. पहिल्या वर्षांपासून सभासदांना लाभांश देण्याचा विक्रम पतसंस्थेने केला आहे. थकबाकीचे प्रमाण अत्यल्प ठेवत विक्रमी वसुलीची परंपरा कायम ठेवण्यात संस्था यशस्वी झाली आहे. ठेवी आणि कर्ज यांचे आदर्श प्रमाण राखत ठेवींवर जास्तीत जास्त व्याज दिले जाते. सोनेतारण कर्जव्यवहारात १०० टक्के वसुली आहे. CR/AR चे कमीत कमी आवश्यक असलेले ९ टक्क्यांचे प्रमाण आज १९.५४ टक्क्यांपर्यंत आणण्यात संस्था यशस्वी झाली आहे. कुशल आणि उच्च विद्याविभूषित कर्मचारी वर्ग, १४ जणांचे संचालक मंडळ आणि १३ जणांची समन्वय समिती तसेच सदस्यांच्या आधारावरच ग्राहकांना नियोजनबद्ध, नम्र आणि जलद सेवा दिला जाते. शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणांच्या अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न पतसंस्था करत आहे. त्यामुळे अल्पावधीतच पतसंस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम झाला आहे.

श्री. पावरी म्हणाले, आपल्या आर्थिक सक्षमतेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत सभासदांच्या हिताला प्राधान्य व ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला संस्था देत आहे. आर्थिक स्पर्धेच्या युगात अर्थकारणाची गती राखण्याचे आव्हान संस्था पेलत आहे. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत, आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकार तत्त्व यांची सांगड घालून विस्ताराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे. सर्व प्रकारचे आर्थिक निकष पूर्ण करीत, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा कोकण विभागाचा गट क्र. १ मधील १ ते १० कोटी ठेवी असणाऱ्या गटांचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला मिळाला आहे.

या कामगिरीमुळेच जिल्ह्यात पतसंस्थेला नव्या पाच शाखा सुरू करायला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पतसंस्थेची जबाबदारीही वाढली आहे, असे श्री. पावरी यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply