वाचनाच्या गोडीसाठी लोकमान्य वाचनालयाचे विद्यार्थ्यांना पुरस्कार

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी आयोजित केलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महिन्याभरापूर्वी चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल (पोफळी), मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय (अलोरे), न्यू इंग्लिश स्कूल (खडपोली) आणि रिगल पब्लिक स्कूल (शिरळ-कोंडे) येथील प्राथमिक शाळेतील मुलांसाठी बालसाहित्यातील पुस्तके वाचनासाठी दिली होती. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचून पुस्तकात काय वाचले आणि मला पुस्तक का आवडले या विषयावर निबंध लिहावयाचा होता. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या निबंधांमधून शाळेतील शिक्षकांनी उत्कृष्ट निबंधाची निवड केली. स्पर्धेत पहिल्या आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शाळांना वाचन प्रेरणा दिनी वाचनालयातर्फे ग्रंथभेट देण्यात आली.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर १५७ वर्षे जुने वाचनालय आहे. या वाचनालयात ७५ हजाराहून अधिक ग्रंथ असून ते चिपळूणकरांना वाचनाचा आनंद देत आहे. वाचनालय साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सतत कार्यरत आहे. तेथे सतत वेगवेगळे उपक्रम चालू असतात. प्रतिवर्षी सामाजिक साहित्यिक पुरस्कार दिले जातात. असाच एक उपक्रम म्हणून वाचनालयाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी वाचन उपक्रम राबविला होता. वाचन प्रेरणा दिनी त्याचे बक्षीस वितरण झाले. भविष्यातही सर्व शाळांना अशीच पुस्तके उपलब्ध होतील, असे वाचनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचनालयाचे संचालक विनायक ओक, मधुसूदन केतकर, धीरज वाटेकर, प्रकाश घायालकर, प्रकाश काणे, सुनील खेडेकर, श्रीराम दांडेकर, सौ. अंजली बर्वे आदींनी शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कार्यक्रमात सहभाग घेतला.

चिपळूण शहरातील बापट आळीतील कन्याशाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनालयाला भेट दिली. यावेळी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रंथपाल गौरी भोसले यांनी कलादालनातील तैलचित्रांची माहिती सांगून वाचनाची आवश्यकता स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी वाचनालयात बसून वाचनाचा आनंद घेतला. तसेच वाचनालयाचे सभासद होण्याची तयारी दाखवली. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका जाधव आणि त्यांच्या सहकारी शिक्षिका यांना वाचनालयातर्फे स्मरणिका भेट देण्यात आली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply