रत्नागिरीत १८ ऑक्टोबरपासून आविष्कारच्या दिवाळी वस्तूंचे प्रदर्शन

रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेचे दिवाळी प्रदर्शन येत्या मंगळवारी (दि. १८ ऑक्टोबर) स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रशिक्षणातून निर्माण होणाऱ्या वस्तूंची विक्री तेथे करण्यात येणार आहे.

स्वतः जगणे सोपे आहे, परंतु स्वतः जगता जगता इतरांना जगणे शिकवणे आणि त्यांना घडवणे हे फारच कठीण काम आहे. ते काम आविष्कार संस्था मतिमंदांच्या विकासासाठी गेली ३६ वर्षे करीत आहे. आविष्कार संस्थेच्या माध्यमातून सौ. सविता कामत विद्यामंदिर, श्री शामराव भिडे कार्यशाळा, वर्षा चोक्सी बालमार्गदर्शन केंद्र, कै. प्रताप मंगेश कानविंदे शीघ्र उपचार केंद्र, श्रीमती मीरा लिमये उत्पादन केंद्र असे उपक्रम कार्यरत आहेत.

प्रौढ दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये एक उत्पादक घटक बनविण्याकरिता शामराव भिडे कार्यशाळा गेली ३० वर्षे कार्यरत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यात कार्यशाळेला यश आले आहे. आतापर्यंत जवळपास ४० विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन होऊन ते आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शासकीय मदत मिळवून देऊन त्यांनादेखील उद्योगाकरिता प्रोत्साहित केले जात आहे.

कार्यशाळा आणि श्रीमती मीरा लिमये उत्पादन केंद्रामध्ये व्यावसायिक प्रशिक्षाणामध्ये खास दीपावलीकरिता लागणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार करून त्यांची विक्री करण्यात येते. विद्यार्थी विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः निर्मिती केलेल्या वस्तू विक्री करतात. त्यामुळे प्रोत्साहित होऊन त्यांची पुढील कौशल्ये विकसित होण्याकरिता मोलाची मदत होत असते.

कार्यशाळेत सध्या स्टेशनरी मेकिंग, शिवण, क्राफ्ट, गृहशास्त्र, प्राथमिक सुतारकाम, मेणबत्ती, ज्वेलरी असे विभाग कार्यरत आहेत. कार्यशाळेच्या या कार्याची दखल घेत जे. एस्. डब्ल्यू. एनर्जी (जयगड) कंपनी गेली सात वर्षे आपल्या आवारामध्ये आविष्कारच्या श्री. शामराव भिडे कार्यशाळा विद्यार्थी निर्मित वस्तू विक्रीसाठी विक्री केंद्राचे आयोजन करीत आहे. वस्तू विक्रीच्या आयोजनाबरोबर वाहतुकीचीही व्यवस्था योग्य रीतीने पार पाडून या विक्री केंद्राच्या आयोजनाच्या वेळी उत्तमरीत्या मदतीचा हात देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत आहेत.

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणातून निर्माण होणाऱ्या वस्तूंची विक्री करून मिळणारा नफा विद्यार्थ्यांना विभागून दिला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. पुढील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने मदत होत असते. गेली १५ वर्षे विद्यार्थी विविध स्टॉलच्या माध्यमातून कलादालनाच्या माध्यमातून स्वतः निर्माण केलेल्या वस्तू विक्री करत आहेत. याचीच प्रेरणा घेऊन आज विद्यार्थी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत.

रत्नागिरीतील यावर्षीच्या विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, यांच्या हस्ते १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावार होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त88 मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित दि. यादव तसेच जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन २१ ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहील.

या विक्री केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन संस्था अध्यक्ष बिपीन शहा, सचिव सौ. संपदा जोशी, समिती अध्यक्ष नितीन कानविंदे आणि व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply