रत्नागिरीच्या स्टार्ट अपचा मुंबईच्या राजभवनात झेंडा

मुंबई : रत्नागिरीतील महिला उद्योजिका सौ. माधुरी प्रतीक कळंबटे यांच्या स्टार्ट अप उद्योगाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर आज मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्य स्तरावरचा एका लाखाचा पुरस्कार स्वीकारला. राज्यपालांसमोर सादरीकरण करण्याची संधीही त्यांना मिळाली.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागातर्फे महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ २०२२ तसेच महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा विजेता सन्मान सोहळा राज्यपाल कोश्यारी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवनात झाला. रत्नागिरीतील वृक्षवल्ली नर्सरीच्या प्रवर्तक सौ. माधुरी कळंबटे यांनी ओअॅसिस प्लांट लायब्ररीचा उद्योग सुरू केला. या वेगळ्या कल्पनेकरिता त्यांना स्टार्ट अप उद्योग म्हणून शनिवारी (दि. १५ ऑक्टोबर) रोजी जिल्हा स्तरावरचे २५ हजाराचे पहिले बक्षीस पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मिळाले. त्यांना राज्यस्तरावरचा एक लाखाचा पहिला क्रमांकही मिळाला. त्याविषयीचे त्यांचे सादरीकरण आज मुंबईत राजभवनात झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सौ. कळंबटे यांनी पुरस्कार स्वीकारला.

राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सौ. माधुरी कळंबटे, प्रतीक कळंबटे

या समारंभात बोलताना राज्यपाल म्हणाले, गेल्या आठ वर्षांत देशामध्ये नावीन्यतेचा विशेषत्वाने पुरस्कार केला जात असून स्टार्टअप्सना चालना देण्यात येत आहे. अशावेळी युवकांनी स्वतःच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास बाळगत वाटचाल केल्यास शंभर कोटी आणि त्यावरची उलाढाल असणाऱ्या अनेक युनिकॉर्न कंपन्या राज्यात निर्माण होतील. राज्याच्या अर्थ विभागाने स्टार्टअप्सना उभारणीसाठी आर्थिक सहकार्य करावे. भौगोलिक मानांकनामुळे जळगावची केळी तसेच इतर कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज मोठे मूल्य मिळत आहे. किसान रेल्वेमुळे कृषी उत्पादन शेतीपासून थेट बाजारापर्यंत नेण्याची सोय केली जात आहे. देशाचा अमृतकाळ सुरू असून युवकांनी स्टार्टअप्सच्या माध्यमातून मातृभूमीसाठी समर्पण भावनेने कार्य करावे, असे आवाहनही राज्यपालांनी सांगितले.

राज्याचा अर्थमंत्री या नात्याने प्रत्येक नवीन स्टार्टअप प्रस्तावाला आर्थिक पाठबळ देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली. ते म्हणाले, देशातील ८० हजार स्टार्टअप्सपैकी ५० हजार एकट्या महाराष्ट्रातील आहेत. तसेच १०० कोटी व अधिक भांडवल असणाऱ्या १०० युनिकॉर्न कंपन्यांपैकी २५ राज्यातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी आहे. नावीन्यतेच्या माध्यमातून देशाला ५ ट्रिलियन डॉलर तसेच राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करता येईल असे सांगताना राज्यातील कल्याणकारी योजना तसेच सुशासन सुदूर भागात पोहोचविण्यासाठी प्रत्यक्ष राबविता येईल, अशा नवसंकल्पनांचा वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात ८७५ औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्यांचा कायापालट करून एक वर्षात त्या ठिकाणी नवनवे अभ्यासक्रम सुरू केले जातील, असे कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. कौशल्य विकास संस्था मंत्रालयापासून बाहेर काढून स्टार्टअपना चालना देण्यासाठी लोकचळवळ उभारली जाईल, असेही लोढा यांनी सांगितले.

सन २०१८ साली स्टार्टअप धोरण आणणारे महाराष्ट्र हे अग्रणी राज्य असून आज स्टार्टअप कंपन्या राज्याच्या लहान लहान शहरांमधून निर्माण होत आहेत, असे ज्येष्ठ वैज्ञानिक व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मार्गदर्शक डॉ रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले. भारतातील कंपन्यांनी आता इतरांचे अनुकरण न करता सर्वसमावेशक नावीन्यतेचा ध्यास घ्यावा, असेही डॉ. माशेलकर म्हणाले.

यावेळी ‘स्टार्टअप वीक स्टोरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला स्वीडनच्या मुंबईतील वाणिज्यदूत अॅना लेकवाल, कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य अधिकारी डॉ. रामास्वामी एन. तसेच युवा उद्योजक उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply