रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्काराचे वितरण पुण्यात ग्रीनलिप रिसॉर्ट येथे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते आज झाले. सीईओ सौ. सुरेखा लवांडे, तज्ज्ञ संचालक दीपक पटवर्धन यावेळी उपस्थित होते. खारवी पतसंस्थेचे सर्व संचालक आणि सीईओ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
याविषयी माहिती देताना अध्यक्ष संतोष पावरी यांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी २०१९ साली स्थापन झालेली खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था सभासदांची विश्वासार्हता वाढवून ग्राहकांचा आर्थिक विकास साधत प्रगतिपथावर असणारी संस्था म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आली. पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर केवळ ४० महिन्यांच्या कार्यकाळात १८ लाख २२ हजाराचा नफा मिळवून अ वर्ग मिळविला. स्थापनेपासूनच्या ४० महिन्यांच्या काळात २० महिन्यांचा काळ करोनाच्या महामारीने ग्रासलेला होता. दीर्घकालीन लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झाले होते. त्या काळातही ग्राहकांना नियोजनबद्ध, नम्र आणि जलद सेवा देत शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणांची अंमलबजावणी करण्यासाठी पतसंस्थेने नियोजनबद्ध प्रयत्न केले. त्यामुळे अल्पावधीतच संस्थेचा आर्थिक सक्षम झाला आहे. संस्था सामाजिक बांधिलकीही जपत असून सभासदांच्या हिताला प्राधान्य देत आहे. ठेवीदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करत आहे. स्पर्धेच्या युगात अर्थकारणाची गती राखण्याचे आव्हान खारवी पतसंस्थेने पेलले. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत पतसंस्थेने आर्थिक व्यवहार वर्धिष्णु केले आहेत.
संस्थेची मार्च २०२२ अखेर सभासद संख्या ३९४७ असून ५ कोटी ६२ लाखाच्या ठेवी, ४ कोटी ४० लाखांची कर्जे, २ कोटी ४६ लाखाची गुंतवणूक, ७ कोटी १६ लाखांचे खेळते भांडवल, १ कोटी १२ लाखाचा स्वनिधी, ६१.१४ टक्के सी. डी. रेशो, ९५.०६ टक्के, वसुली आणि १०० टक्के सोनेतारण कर्जवसुली अशी आर्थिक स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील काही निवडक पतसंस्थांमध्ये खारवी समाज पतसंस्थेच्या समावेश झाला आहे.
जिल्हा हे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र असून १ शाखा, १ सेवाकेंद्र आहे. सलग ३ वर्षे अ वर्ग, आदर्श प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात नफा असणारी संस्था, पहिल्या वर्षापासूनच सभासदांना शेअर्सच्या रकमेवर लाभांश देणारी पतसंस्था, ४० महिन्यांत सोने तारण कर्ज मुदतीत कर्ज खाती बंद झाल्याने एकही कर्ज खात्याचा लिलाव करण्याची नामुष्की आली नाही, पतसंस्थेचा संपूर्ण व्यवहार संगणकीकृत आहे. सभासदांचे मनोबल उंचावून सभासदांमध्ये खऱ्या अर्थाने सहकार रुजवणारी पतसंस्था असा पतसंस्थेचा नावलौकिक आहे. अल्पावधीतच शाखाविस्तारांचा प्रस्ताव पतसंस्थेने सादर केला आहे. संस्थेचे १३ जणांचे संचालक मंडळ, ५ कर्मचारी, १३ जणांचे जिल्हा समन्वय समिती मंडळ आणि नवनियुक्त १ तज्ज्ञ संचालक कार्यरत आहे.
अशी कामगिरी करणाऱ्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला आज राज्य फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे. १ ते १० कोटी ठेवी असणाऱ्या पहिल्या गटातून कोकण विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार खारवी पतसंस्थेला जाहीर झाला आहे. प्रशासकीय अधिकारी, संचालक, समन्वय समिती, सभासद आणि हितचिंतकांमुळे हे यश मिळाल्याचे अध्यक्ष श्री. पावरी यांनी सांगितले.



