मुंबई : आपले हक्क प्राप्त करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संयमाचे दर्शन घडवणाऱ्या सत्याग्रहाची डॉ. यशवंत चवरे यांनी लिहिलेली ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ ही संघर्षगाथा समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे उद्गगार सर्वोच्च न्यायालयाच निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी काढले.

ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि राज्यसभा सदस्य कुमार केतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. गोखले म्हणाले, अस्पृश्यतेविरुद्धची लढाई बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० पासून सुरू केली होती. महाडला चवदार तळ्याच्या पाण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक सामाजिक क्रांतीला जगात तोड नाही. त्यावेळची सामाजिक विषमता इतकी विकोपाला पोहोचली होती की, जनावरांना पाणी पिण्याचा हक्क होता, परंतु माणसाला पाणी पिण्याचा हक्क समाज व्यवस्थेने नाकारला होता. अशा परिस्थितीत डॉ. आंबेडकरांनी या समाजव्यवस्थेविरूध्द बंड पुकारले आणि आम्हीही माणसे आहोत, आम्हालाही माणसासारखे जगण्याचा अधिकार आहे, अशा शब्दांत ठणकावून प्रत्यक्षात कृतीत उतरवलेली तीच ही महाडच्या चवदार तळ्याची क्रांती. भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना बाबासाहेबांना चवदार तळ्यातील पाणी घेण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण निश्चित झाली असणार. त्यांनी मूलभूत अधिकारांच्या यादीत समतेच्या अधिकाराला मुख्य स्थान दिले. भारतीय समाजातील अस्पृश्यतेची प्रथा, रूढी, परंपरा मोडून काढण्यासाठी भारतीय राज्यघटनेत सतराव्या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. यात समतेचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी तरतुदी आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जातीजमाती १९८९ अन्वये जो याचे पालन करणार नाही, तो गुन्हेगार ठरतो. त्यामुळे या महाडच्या सत्याग्रहाचे मोल आजही अधोरेखित होते. डॉ. आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला जी मानवमुक्ती संग्रामाची आग लावली होती, ती अजूनही विझलेली नाही. कारण जोपर्यंत जातिव्यवस्था आहे, तोपर्यंत ती आग अशीच धगधगत राहणार आहे. त्यामुळे जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने लढायला हवे. तरच त्या छेडलेल्या धर्मसंगराचे सार्थक झाल्यासारखे होईल. त्याकाळच्या आणि आजच्या परिस्थितीत फरक पडला नाही.
प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले की, न्यायालयीन लढ्याचा संपूर्ण चिकित्सक अभिलेख असलेला ग्रंथ निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांनी अत्यंत परिश्रमाने शब्दबद्ध केला आहे. बाबासाहेबांनी पाण्याच्या हक्कासाठी महाड चवदार तळ्याचा १९२७ ते १९३७ असा प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयापर्यंत हा मानवमुक्तीच्या हक्काचा लढा आंबेडकरांनी त्यांच्या कायदापांडित्याने जिंकला. एका बाजूला कोर्टाबाहेरची लढाई आणि दुसरीकडे अस्पृश्यांच्या मुक्तीसाठीची वकिली अशी दुहेरी लढाई करून महाडचा मुक्तिसंग्राम जिंकला. गव्हर्नमेंट अॅक्ट १९३५ येण्यापूर्वी तत्कालीन सरकारने २३ कमिट्या नियुक्त केल्या होत्या. त्यापैकी १७ कमिट्यांवर बाबासाहेबांनी काम केले होते. या कमिट्यांनी घेतलेले निर्णय आणि बाबासाहेबांचे कामकाज यावर संशोधन करून यापुढच्या काळात चवरे यांनी ते ग्रंथरूपाने प्रकाशित करावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
कुमार केतकर म्हणाले की, मानवमुक्तीच्या चळवळीच्या इतिहासात या ऐतिहासिक सत्याग्रहाला फार महत्त्व असून या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीच्या बरोबरीने केली जाते. परंतु खऱ्या अर्थाने २० मार्च हा दिवस ह्यूमन राइट्स डे मानायला हवा. समतेसाठी अनेक आंदोलने झाली, भारतीय राज्यघटनेने या देशातल्या सर्व जातिधर्मांना समान हक्क प्रदान केला. पण पाण्याच्या प्रश्नावरून जातीय आणि धार्मिक अस्मिता कशा उफाळून येतात, याची उदाहरणे आपण आजही समाजात पाहतो आहोत. तथाकथित सवर्ण, उच्चधर्मीय, उच्चजातीय लोकांकडून केला जाणारा दुजाभाव, द्वेष, अत्याचार अजूनही समाजात पाझरताना दिसतो. महाडच्या ऐतिहासिक लढ्याची उद्दिष्टपूर्ती तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा विषमतावादी शक्तींना परिघावर लोटून समतावादी शक्ती सामाजिक घडामोडींच्या केंद्रस्थानी येतील. या ग्रंथाचे मोल पाहता डॉ. चवरे यांनी हा ग्रंथ इंग्रजी भाषेत प्रकाशित करणे गरजेचे आहे.
हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद करताना डॉ. चवरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा केलेला मुक्तिसंग्राम हा आधुनिक जगातील मानवाधिकाराचा पहिला लढा, त्याचप्रमाणे भारतीय लोकांचा मुक्तिसंग्रामही ठरला. येथूनच भारतीय समाजाला आपल्या हक्कांची जाणीव झाली. माझा पीएचडीचा प्रबंध पूर्ण झाल्यानंतर हे संशोधनाचे काम पुढे सुरूच ठेवावे, असे आवाहन माझे मार्गदर्शक आर. के. क्षीरसागर यांनी केले. बाबासाहेबांनी अस्पृश्यांना मुक्ती, स्वाभिमान आणि माणूसपण मिळवून देण्यासाठी महाडचा मुक्तिसंग्राम पुकारला. अस्पृश्यांच्या सर्वांगीण प्रगतीची सुरुवात बाबासाहेबांनी महाड येथे केली. या सत्याग्रहाची १९२७ ते ३७ या कालखंडातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे शोधण्यासाठी आणि लेखाजोखा लिहिण्यासाठी मला १५ वर्षे परिश्रम करावे लागले. त्यातली मोडी अक्षरातली कागदपत्रे देवनागरी करण्यासाठी जिवन्त भन्ते यांनी केले. हे सर्व संकलन करताना बाबासाहेबांनी सत्याग्रहाची तात्त्विक बाजू मांडून या सत्याग्रहाची भूमिका आणि महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आणून दिले. महाड कोर्टातील खटला, अस्पृश्यांनी चवदार तळे बाटवल्याने त्या काळातील अनेक वृत्तपत्रांनी बाबासाहेबांविरोधात उठवलेली टीकेची झोड आणि बाबासाहेबांनी त्याचा अभ्यासपूर्ण शैलीत घेतलेला समाचार, महाड सत्याग्रहाची व्यूहरचना, बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन का केले, इत्यादी अनेक गोष्टी नव्याने माझ्या नजरेस आल्या. हा ग्रंथ इंग्रजीसह इतर राज्यांतील भाषांमध्ये अनुवादित होत आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केल्याप्रमाणे १९३५ च्या घटनेसंदर्भात झालेल्या सर्व घटनांचा धांडोळा घेण्याचे काम यापुढच्या काळात सुरू करून तो ग्रंथरूपात आणण्याचे काम मी नक्की करणार आहे, असे अभिवचन देतो.
महाडच्या सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभागी झालेले सत्याग्रही आणि साक्षीदार सुरबानाना टिपणीस, पांडुरंग पाल्येशास्त्री, संभाजी गायकवाड, आर. बी. मोरे यांचे नातू भीमराव आंबेडकर, मिलिंद टिपणीस, आनंद पालये, कॉम्रेड सुबोध मोरे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, विजय सुरवाडे, बापू सोनावणे, न्यायाधीश पलसपगार, सुधाकर सुराडकर, आंबेडकरी विचारवंत रमेश शिंदे यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ, साहित्यिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त जिल्हा न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल यांनी केले. निवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. के. सोनवणे यांनी आभार मानले.
(रवींद्र मालुसरे, अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई. संपर्क – ९३२३११७७०४)
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
